ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक आणि दुर्गप्रेमी गोपाल नीलकंठ दांडेकर ऊर्फ गोनीदा यांच्या जन्मशताब्दी पर्वातील पहिला कार्यक्रम सहकारनगर परिसरातील साहित्यप्रेमींसाठी होत आहे. स्वानंद सोसायटीच्या सभागृहामध्ये १६ ते १८ ऑक्टोबर असे तीन दिवस दररोज सायंकाळी पाच वाजता गोनीदांच्या साहित्याचे अभिवाचन करीत जागर घडविला जाणार आहे.
गोनींदाची कन्या डॉ. वीणा देव, जामात डॉ. विजय देव आणि नातजावई रुचिर कुलकर्णी यांनी केलेल्या ‘मोगरा फुलला’ या कादंबरीच्या अभिवाचनाने १६ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होणार आहे. माजी आमदार उल्हास पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी ‘मृण्मयी’ कादंबरीचे अभिवाचन होणार असून या कादंबरीचे भाषांतर करणाऱ्या मीरा नांदगावकर या वेळी प्रमुख पाहुण्या असतील. ‘मृण्मयी’, ‘दास डोंगरी राहतो’ आणि ‘तुका आकाशाएवढा’ या गोनीदांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ‘मोगरा, मृण्मयी, गोनीदा आणि ज्ञानेश्वरी’ या विषयावरील कल्याणी नामजोशी यांच्या व्याख्यानाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तळेगाव दाभाडे येथून स्थलांतर केल्यानंतर अप्पांचे वास्तव्य सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनी येथे होते. त्यामुळे या कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ. वीणा देव यांनी दिली.