सरकारी पक्षाचा युक्तिवाद

एल्गार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या या कारवाया देशविघातक असून गौतम नवलाखा हे देशद्रोहीच असल्याचा युक्तिवाद गुरुवारीसरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला.

नवलाखा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर गुरुवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

परवेझ नामक व्यक्ती काश्मीरमध्ये एक सामाजिक संघटना चालवत आहे. या संघटनेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये आर्थिक व्यवहार  सुरू आहेत. नवलाखा सिमीसाठी कार्यरत असलेल्या शफीक बक्षी याला भेटले होते. माओवादी संघटना आणि हिज्बुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या प्रमुखांची बैठक घ्यायची त्यांचे नियोजन होते, असे तपासातून पुढे आले आहे. नवलाखा यांनी हिज्बुल मुजाहिदीन संघटनेशी संपर्क साधून देशाचे किती नुकसान केले?, माओवादी संघटनेत किती विद्यार्थ्यांची भरती केली आहे? याचा तपास करायचा असल्याचे अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयात सांगितले.

‘१२ नोव्हेंबपर्यंत अटक नको’

नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबर रोजी संपेल. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल १२ नोव्हेंबर रोजी आहे. तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले आहेत.