scorecardresearch

योजना लाभार्थ्यांची माहितीची आता ‘आधार कार्ड’शी जोडणी ; आधार जोडणी पूर्ण करण्यास डिसेंबरची मुदत, शिष्यवृत्ती डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात

१ जानेवारी २०२३पासून शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

Aadhaar-Card
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : शालेय शिक्षण विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलती आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांचा माहितीसाठा (डेटाबेस) तयार करून तो आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच १ जानेवारी २०२३पासून शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, महिला व बालविकास विभाग अशा विभागांद्वारे पोषण आहार, विविध सवलती आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांपासून लाभार्थी वंचित राहू नयेत, समाजातील विविध घटक योजनांच्या मुख्य प्रवाहात यावेत, योजना लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शी पद्धतीने पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू होता. त्या अनुषंगाने लाभार्थ्यांची माहिती आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने लाभार्थ्यांची माहिती आधारकार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट केले आहे.

सर्व विद्यार्थी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यासाठी त्यांची नोंदणी आणि प्रतिदिन उपस्थिती वेब आधारित उपयोजनाद्वारे (वेब बेस्ड ॲप्लिकेशन) अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. पोषण आहाराशी संबंधित माहिती आधार कार्डशी जोडूनच योजनांचा निधी वितरित करण्यात यावा. आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसलेल्या जिल्ह्यांनी ती कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Government plans to link aadhaar with schemes related to school education print pune zws