लोकसत्ता वार्ताहर

शिरुर : राज्यातील महायुतीचे सरकार आंधळ मुके व बहिरे असून या सरकाराच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी होवू शकते. नैतिकता राज्यकारभारात आढळून येत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हर्षवर्धन सपकाळ हे मढी येथे जात असताना शिरुर येथे थांबले असता बातमीदारांसमवेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस आयचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार मोहन जोशी होते.

सपकाळ म्हणाले की सगळ्यांनी गुण्या गोविंदानी राहण्याची आपली संस्कृती आहे. सध्या जातीयवाद, भेदाभेद, द्वेष याचा उच्चांक झाला असून हे थांबले पाहीजे. हे सर्व थांबिण्यासाठी सदभाव हे उत्तर आहे. त्यानुसार ८ मार्च पासून सदभाव पदयात्रा बीड येथून सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मढी येथील यात्रेत काही जणांनी येवू नये असं सांगितल जातं. हे दुर्दैवी आहे. मढीला भेट देवून गाऱ्हाणे मांडणार असून पारिस्थितीत दुरुस्ती व्हावी अशी मागणे मांडणार असल्याचे ते म्हणाले. त्याच बरोबर भगवानगड व नारायणगड येथे ही सदभावनेचे साकडे घालणार आहे. महापुरुष, संत यांनी समाजातील सर्व घटकांसाठी काम केले त्यांना जातीपातीत विभागू नये. सध्या जातीपातीत विभागले जात आहे. महाराष्ट्रात सदभावना वाढीस लागण्यासाठी काम करीत असल्याचे ते म्हणाले.

सध्याचा राज्यकारभारात नैतिकता दिसून येत नाही. औरंगजेबाचा कारभारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार काम करीत असून तमाम मावळ्यांनी याचा निषेध नोंदविला पाहिजे, असे ते म्हणाले. महायुतीच्या सरकारने निवडणूकीत शेतकरी, लाडक्या बहिणी व अन्य घटकांसाठी विविध घोषणा केल्या होत्या. येत्या अर्थसंकल्पात याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष असल्याचे ते म्हणाले.

महापुरुषाच्या बाबतीत महापुरुषांच्या अपमान करा व सरंक्षण मिळवा अशी योजना शासनाची असल्याचे ते म्हणाले अभिनेता राहूल सोलापूरकर , महेश कोरटकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चूकीचे बोलतात त्यांना सुरक्षा दिली जाते . विनायक सावरकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण केले .त्यांना पुरस्कार दिला जातो . महापुरुषाचा अपमान करा सुरक्षा व पुरस्कार घ्या असे सरकार महापुरुषाचा बाबतीत करत असल्याची टीका त्यानी केली.

विविध भाषा हे आपले वैशिष्ट्य आहे. परंतु काहीच्या मराठी भाषेसह प्रादेशिक भाषा चिरडून टाकण्याचा अजेंठा असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. हॉटेल मार्व्हलीन येथे सपकाळ यांचे स्वागत कॉग्रेस आयचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर, माजी उपसभापती पांडूरंग थोरात, संतोष गव्हाणे अमजद पठाण, संदिप बिहाणी, चंद्रकांत चोपडा, अजिमभाई सय्यद, अशोक भुजबळ, संकेत गवारी, प्रदीप मेहकरे आदीनी केले.