”छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी होते. ते युगपुरुष, पराक्रमी,चातुर्य, बुध्दी कुशलता या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. महाराजांनी केलेल्या कामांची देशाच्या बाहेरही नोंद असून, त्यांचे कार्य सर्वांना सांगण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.” असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन, शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली. तसेच यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा देखील केली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुदध देशपांडे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, आचार्य गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, ”शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे जी शिवसृष्टी उभी करत आहेत. त्या माध्यमातून आताच्या पिढीला त्याकाळाचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे. ज्यावेळी शिवसृष्टीचे काम पूर्ण होईल. तेव्हा देशभरातून नागरिक शिवसृष्टी पाहण्यास येतील आणि त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळणार आहे. तर बाबासाहेबांच्या शिवसृष्टीत येणारा, प्रत्येक पर्यटक तीर्थयात्री बनेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.”

राज्यपाल म्हणतात, ”आप भी आ जाना….”

गड, किल्ले पर्यटकांसाठी बंद असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या सिंहगडावर जाणार आहेत. असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना आज विचारला असता त्यावर ते म्हणाले की, राज्यपाल महोदय यांनी कुठे जावे आणि कुठे जाऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. पण काल मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कदाचित त्यांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

तर याच मुद्द्यावर आज शिवसृष्टीच्या कार्यक्रमानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विचारले की, आपण सिंहगडावर जाणार का? त्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता. आप भी आ जाना, असे पत्रकारांना म्हणाले, त्यावर एकच हशा पिकला.