पुणे : उद्योगांना आवश्यक कौशल्ये, रोजगारक्षमता तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठीचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनामध्ये (जीपीपी) करण्यात आला आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे संपूर्ण सत्र थेट उद्योगांत पाठवून कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्यात येत असून, राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन पुणे (जीपीपी) ही महत्त्वाची संस्था आहे. १९५७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला १९९४ मध्ये स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला. संस्थेमध्ये स्थापत्य, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, मेटलर्जी (धातुशास्त्र), संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझाइन अँड गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग हे पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतात. पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त झाल्यानंतर नोकरी करणे किंवा पदवी पूर्ण करणे असे दोन्ही पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिकतानाच कामाचा अनुभव मिळण्यासाठी सहा महिन्यांचे कार्यप्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘जीपीपी’चे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील म्हणाले, ‘तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना सहा महिने कार्यप्रशिक्षणाचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. त्यासाठी उद्योगांकडूनच मागणी आली होती. पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे कार्यप्रशिक्षण पुरेसे ठरत नसल्याचे उद्योगांचे मत होते. त्यामुळे स्वायत्ततेंतर्गत संस्थेच्या नियामक मंडळ व अभ्यास मंडळात सहा महिन्यांच्या कार्यप्रशिक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला. पदविका अभ्यासक्रम सहा सत्रांचा असतो. आता सहा महिन्यांचे कार्यप्रशिक्षण सुरू केल्यामुळे पाच सत्रांमध्ये सैद्धान्तिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येतो. यंदा डिसेंबर ते जून या कालावधीत कार्यप्रशिक्षण सुरू करण्यात आले. संस्थेतील ८५०हून अधिक विद्यार्थी २५०हून अधिक कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.’

सहा महिन्यांच्या कार्यप्रशिक्षणाची यापुढे कायमस्वरूपी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये, रोजगारक्षमता प्राप्त करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या संधीही सुलभपणे मिळतील. तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्या प्रोत्साहनामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबवणे शक्य झाले, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

उद्योग गरजांनुरूप अध्यापनातही बदल

‘कार्यप्रशिक्षणाच्या सहा महिन्यांसाठी विद्यार्थ्यांना उद्योगांकडून ५ हजार ते १५ हजार रुपयांदरम्यान विद्यावेतनही दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत शासकीय तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना उद्योगांकडून मोठी मागणी आहे. आता सहा महिन्यांच्या कार्यप्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी होणार आहे. तसेच, या निमित्ताने शिक्षकही उद्योग क्षेत्राशी थेट जोडले जाऊन त्यांनाही उद्योगांतील तंत्रज्ञानात्मक बदलांची जाणीव होत आहे. त्यामुळे अध्यापनामध्येही बदल करणे शक्य आहे,’ असे प्रशिक्षण आणि आस्थापना अधिकारी डॉ. नितीन कुलकर्णी यांनी नमूद केले.

साडेसात लाख रुपयांचे पॅकेज

शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भरतीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रतिसाद वाढला आहे. यंदा गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक वार्षिक साडेसात लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्याला मिळाल्याचे डॉ. राजेंद्र पाटील यांनी नमूद केले.