लोकसत्ता वार्ताहर
लोणावळा: लोणावळा परिसरातील कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सदस्याला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ग्रामपंचायतीने तयार केलेला सिमेंट रस्ता चौघा आरोपींनी खोदल्याने ग्रामपंचायत सदस्याने जाब विचारला. वादातून चौघांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंद्रकांत दत्तू ढाकोळ, सागर मधुकर उंबरे, राजेंद्र मारुती वरखडे, बैजू मॅथ्यू (चौघे रा. कुणेगाव खंडाळा, ता. मावळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य संजय ढाकोळ यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (३१ मार्च) सायंकाळी आरोपी ढाकोळ, उंबरे, वरखडे, मॅथ्यू यांनी ग्रामपंचायतीने तयार केलेला सिमेंट रस्ता खोदत होते. ग्रामपंचायत सदस्य संजय ढाकोळ यांनी आरोपींना विचारणा केली. तेव्हा आरोपी त्यांच्यावर चिडले. आरोपी चंद्रकांत ढाकोळ यांनी लक्ष्मण यांच्या पायावर गज मारला. आरोपी सागर उंबरे, राजेंद्र वरखडे, बैजू मॅथ्यू यांनी संजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीत संजय यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आरोपींनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे ढाकोळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार घोटकर तपास करत आहेत.