दुष्काळनिवारणासाठी भक्तजनांची प्रार्थना
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला राज्यभरात गुरुवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. सार्वजनिक मंडळांनी सजवलेल्या रथांमधून पारंपरिक पद्धतीने ‘श्रीं’ची मिरवणूक काढली, तर ‘मंगलमूर्ती मोरया’ असा घोष करत घरोघरी गणरायाला आणण्यात आले. उत्सवांच्या मंडपांवर न्यायालयाने घातलेले र्निबध आणि राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई या पाश्र्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत असून राज्यातील दुष्काळ लवकरात लवकर संपू दे, चांगला पाऊस होऊ दे आणि सुखसमृद्धी येऊ दे.. अशी प्रार्थना गुरुवारी श्री गणरायाच्या चरणी भक्तांनी केली.
यंदाच्या उत्सवावर असलेले दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन अनेक सार्वजनिक मंडळांनी दुष्काळ निवारणासाठी उपक्रम सुरू केले असून हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय़ आहे. पुण्यातील अनेक मंडळांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करणार असल्याचे उत्सवाच्या पहिल्या दिवशी जाहीर केले. त्या बरोबरच मराठवाडय़ातील दुष्काळी भागात जनावरांसाठी ज्या छावण्या सुरू झाल्या आहेत त्या छावण्यांसाठी चारा, कडबा पाठवण्याचेही काम अनेक मंडळांनी हाती घेतले आहे. त्याचाही प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. काही मंडळांनी दुष्काळी भागातील गावे दत्तक घेण्याचा उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने हाती घेतला आहे.
पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन ‘पाण्याची बचत करा’, ‘गोधन वाचवा’ हे आणि असे अनेक समाजोपयोगी संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पाऊल उचलले आहे. काही मंडळांनी तसे फलकही लावले आहेत, तर काही मंडळांनी जनजागृतीसाठी देखावेही केले आहेत. या विषयांसह समाजप्रबोधन करणारे इतर देखावे तसेच प्रसंगनाटय़ही यंदाच्या उत्सवात पाहायला मिळणार आहेत. वैशिष्टय़पूर्ण गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यनगरीत गुरुवारी मानाच्या मंडळांसह अनेक सार्वजनिक मंडळांनी मोठय़ा थाटामाटात गुरुवारी श्री गणरायाची मिरवणूक काढून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. फुलांचे रथ, रांगोळ्यांच्या पायघडय़ा आणि युवक-युवतींची ढोलताशा पथके या वेळी लक्षवेधी ठरली. मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा उत्सव मंडपांमध्ये लागल्या होत्या. गणरायाला नारळाचे तोरण अर्पण करण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती.