पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे जमिनीच्या वादातून नातवाने आजोबाला बेदम मारहाण केली व या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आजोबांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे आहे. भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी रा. केंदुर तालुका शिरूर असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील मौजे ताथवडे वस्ती केंदुर येथे शंकरराव ताथवडे हे कुटुंबीयांसोबत राहत होते. या परिसरात त्यांची शेती आहे, यावरून त्यांचा नातू भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी याच्या सोबत काही दिवसांपूर्वी त्यांचा वाद झाला होता.

हा राग मनात धरून नातू भरत चौधरी याने आजोबांच्या घरात घुसून त्यांना धमकावत व शिवीगाळ करत जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. तर, यावेळी आजोबांना वाचविण्यास आलेल्या आजीला देखील आरोपीकडून मारहाण झाली. यामध्ये देखील त्या देखील जखमी झाल्या आहेत. तर, आजोबा शंकरराव ताथवडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णलायात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, आरोपी भरत चौधरी यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.