पुणे : महापालिकेच्या प्रेक्षक गॅलरीतून पत्रके टाकणारा कार्यकर्ता ते उपमहापौर असा उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेल्या परशुराम वाडेकर यांचा प्रवास आहे. महापालिकेच्या उपमहापौर पदावर वाडेकर विराजमान झाले. नगरसेवक म्हणून निवडून आलेले वाडेकर हे पहिल्याच प्रयत्नात उपमहापौर झाले आहेत.
चळवळीतील कार्यकर्ता अशी सुरुवात असलेल्या परशुराम बाळकृष्ण वाडेकर यांचा उपमहापौरपदापर्यंतचा प्रवास जिद्दीचा आहे. बोपोडी येथे १ फेब्रुवारी १९६८ रोजी त्यांचा जन्म झाला. दापोडी येथील सिद्धार्थनगर येथे अतिशय हलाखीत त्यांचे बालपण गेले. आई लक्ष्मीबाई आणि वडील बाळकृष्ण शिवराम वाडेकर यांच्याकडून सामाजिक जाणीव आणि लढाऊ वृत्ती त्यांच्यात रुजली.
विद्यार्थिदशेपासूनच वाडेकर यांनी संघर्ष करून सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या नामांतर आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला आहे. याच काळातच आंबेडकरी विचारसरणीशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विविध प्रश्नांवर त्यांनी महापालिकेत आंदोलनेदेखील केली होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रेक्षक गॅलरीतून निषेधाची, सत्ताधाऱ्यांच्या धिक्काराची पत्रके टाकून आंदोलनेही वाडेकर यांनी केली होती.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय झाले. २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांच्या विरोधात निवडणूक लढवित त्यांनी राजकीय वाटचाल अधिक ठळक केली. त्यानंतर सलग तीन विधानसभा निवडणुका लढवून त्यांनी बोपोडी आणि त्यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपली ओळख निर्माण केली.
पुण्यात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाड्यातील पहिली मुलींची शाळा या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी पुरोगामी संघटनांसह त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहिले आहे. शिक्षण, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला.
पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनीता परशुराम वाडेकर यांनी प्रभाग क्रमांक ८ (बोपोडी–औंध) मधून सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळविला. भाजप-आरपीआय युतीच्या माध्यमातून लढविण्यात आलेल्या या निवडणुकीनंतर पहिल्याच वर्षी त्यांच्या पत्नी सुनीता यांना उपमहापौरपदावर संधी देखील देण्यात आली. त्यांच्या या विजयामुळे वाडेकर कुटुंबाचा महापालिकेतील प्रभाव अधिक दृढ झाला.
महानगरपालिका २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत परशुराम वाडेकर यांनी प्रभाग क्र. ८ बोपोडी येथून विजय मिळवत पहिल्याच प्रयत्नात उपमहापौरपदाची संधी साधली. चळवळीतील कार्यकर्त्यापासून महापालिकेच्या सत्ताकेंद्रापर्यंतचा हा प्रवास आंबेडकरी विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांची साक्ष देणारा ठरला आहे.
उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहात कधीकाळी सर्वसाधारण सभेमध्ये प्रेक्षक गॅलरीतून पत्रके टाकणारा एक कार्यकर्ता अशी ओळख होती. कधी तरी आपणच या सभागृहात निवडून येऊन उपमहापौरपदी विराजमान होऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

