पुणे : ‘केंद्र सरकारच्या ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे चीनवर दबाव निर्माण होईल,’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. ‘आपल्या देशात खोल समुद्रातील बंदरे नाहीत. आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाची पावले टाकण्यात येत आहेत. अंदमान-निकोबार बेटांजवळच्या खोल समुद्रात बंदर उभारण्यात येत आहे,’ असेही भूषण गोखले यांनी नमूद केले.
लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीसलिखित ‘ऑपरेशन सिंदूर’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. लेखक लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, अनुवादक डॉ. प्रसाद कुलकर्णी, प्रकाशक अखिल मेहता, पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे या वेळी उपस्थित होते.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल बोलताना गोखले म्हणाले, ‘इराण आणि आखातातून येणाऱ्या तेलासाठी युद्ध संपण्याची आपण सगळेच वाट पाहत आहोत. कोणत्याही युद्धात, लढाईत किती वाताहत होते, त्याचे नेमके परिणाम काय होतात, हे ते युद्ध, ती लढाई कधी संपते, यावर अवलंबून असते. दुसरे महायुद्ध संपायला पाच वर्षे लागली. त्या अनुषंगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ ७२ तासांत संपले. युद्ध कधी संपवायचे याचे ते अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे.’
‘दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला २६ कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या कुटुंबांनी दाखविलेल्या धैर्याने आणि भारताने दिलेल्या उत्तराने जगाला दाखवून दिले, की दुःख आम्हाला खचवत नाही. ते आम्हाला अधिक दृढ, अधिक एकसंघ, अधिक सक्षम बनवते,’ अशी भावना लेफ्टनंट जनरल हसबनीस यांनी व्यक्त केली. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
‘पहलगाम हल्ल्याची आठवण’
‘सिनेमात, लष्कराच्या छावणीत दिसणाऱ्या बंदुका डोळ्यांसमोर ताणल्या होत्या. त्यातून गोळ्या बाहेर पडत होत्या. त्या बंदुकांचे आवाज आजसुद्धा कानामध्ये घुमतात. ‘तुम्ही हिंदू आहात का मुसलमान’ असे विचारून अतिरेक्यांनी वडिलांच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. हातात ‘एम-४’ रायफल असलेला २५-२६ वर्षांचा एक मुलगा अचानक समोर येतो, आपल्याला गोळ्या घालतो हे समजायलासुद्धा एक तास लागला होता. आजही तो प्रसंग आमच्या डोळ्यांसमोर येतो,’
पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांनी कुटुंबावर बेतलेल्या प्रसंगाची करुण कहाणी सांगितली. ‘घरातून बाहेर पडताना प्रश्न पडतो की, आज ही घटना परत घडली तर काय? ते अतिरेकी आपल्या देशात, आपल्या घरात घुसून आपल्या लोकांना मारू शकतात. पण, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव अशा लष्कराच्या अनेक मोहिमा सीमावर्ती भागात सुरू आहेत. दहशतवाद संपविण्यासाठी भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून उभे आहे. आपणही त्या सर्वांना अंतर्गत मदत करणे गरजेचे आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
