मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज(मंगळवार) उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

२५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सदावर्तेंवर २०२० मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. मात्र, आता कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना झाले आहेत.

गुणरत्न सदावर्तेंनीच मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं, याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आलं होतं. मात्र, सातारा पोलिसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतलेले असल्याने आता पुन्हा त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची गरज काय? असा सवाल न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला होता.

मराठा समाजाबद्दल सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १ सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अमर रामचंद्र पवार (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली होती.