पुणे : ‘सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धाचे वातावरण आहे. त्यामुळे परदेशात लोक एक देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करीत आहेत. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तर, दुसरीकडे जागतिक पातळीवर पाण्याचे संकटही गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून त्यावर मार्ग काढण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच आहे’, असे मत प्रतिपादन रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आयोजित ‘ग्रीन एक्स्पो २०२६’ प्रदर्शनाच्या उद्घाटन डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आले. त्याप्रसंगी सिंह बोलत होते. रोटरीचे प्रकल्प प्रमुख केशव ताम्हणकर, प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी पुणे विस्डमच्या अध्यक्षा स्वाती यादव या वेळी उपस्थित होत्या. पुणे महानगरपालिका, वनराई, जे. पी. श्रॉफ फाउंडेशन आणि टाटा ग्रीन बॅटरीज यांचे सहकार्य लाभले आहे.
सिंह म्हणाले, ‘नदी ही पृथ्वीवरील प्रमुख घटक आहे, तिच्याबरोबर छेडछाड करू नका. पाणी हे ब्रह्म असून त्याचे मोठे महत्त्व आहे. सध्या जगाच्या अनेक भागांमध्ये असलेल्या युद्धाच्या वातावरणामुळे परदेशात अनेक देशांमधील नागरिक दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करीत आहेत. जगण्याची धडपड, रोजगार मिळविण्यासाठी हे सुरु असले तरी जागतिक पातळीवर पाण्याचे संकट कठीण होत चालले आहे, त्यावर काम करण्याचे मोठे आव्हान आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी भूजल पातळी खालावत चालली असून ती देखील चिंतेची बाब आहे. पाण्याच्या प्रश्नावर काम करताना शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा एकत्रपणे वापर होण्याची गरज आहे. आपण नीर, नारी आणि नदी या तीन गोष्टींना देखील खूप महत्व देण्याची गरज आहे.’
‘पर्यावरण क्षेत्रात शाश्वत विकासाचे काम करत असताना त्यामध्ये संवेदना असणे आवश्यक आहे. आपण डोळे आणि हृदयाने त्याच्याबरोबर जोडले गेलो तरच आपल्याला अभिप्रेत असणारा विकास करणे सहज साध्य होणार आहे. आपण हाती घेतलेले ग्रीन सोसायटी, ग्रीन स्कूल असे प्रकल्प त्यामधून यशस्वी होऊ शकतील. कोणत्याही नव्या कामामध्ये पुणे हे देशात पहिल्या क्रमांकावर असते’, असे डॉ. राजेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
पर्यावरण क्षेत्रात येत असणारे नवनवीन तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे होत असल्याचे रोटरीचे संचालक संतोष मराठे यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनमानाला प्रोत्साहन देणे हा या एक्स्पोचे मुख्य उद्देश असल्याचे केशव ताम्हनकर यांनी अधोरेखित केले. आरती नवाथे यांनी सूत्रसंचालन केले.
रेल्वेने जाताना पूर्वी चंबळचे खोरे आल्यावर ‘खिडक्या लावा, चंबळ आले आहे’, असे ओरडून संगितले जायचे. सध्या इथे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या भागातील ६ हजार ३३२ डाकूंनी हातातील बंदूक टाकून देत या भागातील नद्या जिंवत करण्याचे काम केले आहे, त्यामुळे तेथे पाणी आले असून हे लोक उत्तम प्रकारे शेती करत आहेत. – डॉ. राजेंद्र सिंह, जलतज्ज्ञ.
