पुणे : उन्हाळय़ाच्या सुट्टीमध्ये मुलांच्या मनोरंजनासाठी रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अॅक्टिव्हिटी रीसर्च अँड टेक्नॉलॉजी (स्मार्ट) यांच्यातर्फे ७ ते २२ मे या कालावधीत ग्रिप्स नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील आवारात या नाटय़महोत्सवाबरोबरच ६ ते १४ वयोगटातील शालेय आणि किशोरवयीन मुला-मुलींसाठी अभिनय, नृत्य, कठपुतळी, बोलक्या बाहुल्या आणि चित्रपटनिर्मिती या विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. रेनबो अम्ब्रेला फाउंडेशनचे श्रीरंग गोडबोले यांनी सोमवारी ही माहिती दिली. अभिनेत्री-लेखिका आणि दिग्दर्शिका विभावरी देशपांडे, स्मार्ट संस्थेच्या संचालिका राधिका इंगळे आणि रेनबो अम्ब्रेला फाउंडेशनचे हृषिकेश देशपांडे या वेळी उपस्थित होते.
गोडबोले म्हणाले, ग्रिप्स थिएटरच्या संकल्पनेवर निर्मिती करण्यात आलेल्या ‘छान छोटे, वाईट्ट मोठे’, ‘नको रे बाबा’, ‘प्रोजेक्ट अदिती’ आणि ‘एकदा काय झालं‘ या चार नाटकांचे प्रत्येकी चार प्रयोग होणार आहेत. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील राम पुरुषोत्तम संकुलात दररोज सायंकाळी सात वाजता ही नाटके सादर केली जातील. त्यापूर्वी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून करमणुकीचे उपक्रम होणार आहेत तसेच सामान्यांना माहिती नसलेल्या पुण्यातील विविध ठिकाणी वारसा फेरीचा उपक्रम या महोत्सवाचा एक महत्त्वाचा घटक असेल. हा उपक्रम डॉ. अनिल अवचट यांच्या पुण्याची अपूर्वाई या पुस्तकावर आधारित असेल. शालेय आणि किशोरवयीन मुला-मुलींसाठी अभिनय, नृत्य, कठपुतळी, बोलक्या बाहुल्या आणि चित्रपटनिर्मिती या विषयांवर कार्यशाळा होणार आहेत.
मनोरंजनाच्या माध्यमातून मूल्यशिक्षण देण्याच्या उद्देशाने विविध माध्यमातून मुलांसाठी साहित्य निर्माण करण्याच्या क्षेत्रात नियोजित काम करण्याच्या उद्देशाने रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन सुरू करण्यात आले आहे. याद्वारे सध्याच्या काळाशी सुसंगत उपक्रम तयार करण्यात येणार आहेत. ज्यामुळे मुलांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती, स्वतंत्र भारतात राहण्याचे महत्त्व, सामाजिक सलोखा, भूतदया यांसारखे गुण विकसित होण्यात मदत होईल.
– श्रीरंग गोडबोले, प्रमुख, रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन