पुणे : उपाहारगृहचालक किराणा माल विक्रेत्यांकडून मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी करतात. करोना संसर्सामुळे गेले दीड वर्ष उपाहारगृहचालक अडचणीत आले आहेत. वर्षांनुवर्षे किराणा माल विक्रेत्यांकडून अन्नधान्याची खरेदी करणाऱ्या उपाहारगृहचालकांच्या उधारीमुळे किराणा माल व्यावसायिक धास्तावले आहेत. व्यावसयिक संबंधामुळे किराणा माल विक्रेत्यांची अडचण होत असून उधारी वसूल कशी करायची, असा प्रश्न किराणा माल विक्रेत्यांना भेडसावत आहे.

शहरातील अनेक उपाहारगृहचालक मार्केट यार्डातील घाऊक बाजार तसेच किरकोळ किराणा माल विक्रेत्यांकडून अन्नधान्य खरेदी करतात. दरमहा किंवा आठवडय़ाला उपाहारगृहचालकांकडून हिशेब करून पैसे अदा केले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांत निर्बंधामुळे तसेच सततच्या वेळा बदलांमुळे उपाहारगृहचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे परत होत नसल्याने किराणा माल विक्रेतेही धास्तावले आहेत. मध्यंतरी थकीत उधारीमुळे काही विक्रेत्यांनी पोलिसांकडे तक्रारीही दिल्या होत्या.

उपाहारगृहचालकांकडून दररोज मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्य, मसाले, तेल, तूप तसेच अन्य वस्तूंची खरेदी केली जाते. उपाहारगृहातील कामगारांकडे ही जबाबदारी सोपविली असते. यादी दिल्यानंतर त्यांना आवश्यक त्या वस्तू दिल्या जातात. उपाहारगृहचालकांची वेगळी वहीच ठेवली असते. खरेदीची नोंद करून दरमहा किंवा आठवडय़ाला हिशेब केला जातो. करोनाच्या संसर्गामुळे उपाहारगृहचालकांकडून असलेली मागणी कमी झाली आहे. काही जणांनी खरेदी केलेल्या अन्नधान्याचे पैसे देण्यास वेळ लावला आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, व्यावसायिक संबंधामुळे कटू निर्णय घेता येत नाही. उधारी वसूल कशी करायचा, हा देखील प्रश्न आहे, असे किरकोळ बाजारातील एका किराणा माल विक्रेत्याने सांगितले.

अनेकांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन उपाहारगृहे सुरू केली. टाळेबंदीत भाडे थकल्याने उपाहारगृहे बंद करण्यात आली. काही उपाहारगृहचालकांनी उधारीवर किराणा माल विक्रेत्यांकडून अन्नधान्याची  खरेदी केली होती. किराणा माल व्यावसायिकांचे पैसे न दिल्यने मध्यंतरी काही जणांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. शहरातील अनेक  उपाहारगृहचालकांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत. त्यांचे किराणा माल व्यावसायिकांशी चांगले आहेत.

– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना र्मचट्स चेंबर

काही किराणा माल व्यापाऱ्यांनी उपाहारगृहचालकांच्या अडचणी समजावून घेतल्या. टाळेबंदीनंतर उपाहारगृहचालकांपुढे अडचणी उभ्या राहिल्या.अशा परिस्थितीत उपाहारगृहचालक आणि किराणा माल विक्रेत्यांनी एकमेकांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गही काढला.

– गणेश शेट्टी, अध्यक्ष पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन