scorecardresearch

पालिका मैदानांवर खेळणे यापुढे खेळाडूंना अवघड

महापालिका शाळांची मैदाने शाळा सुटल्यानंतर छोटय़ा-मोठय़ा क्रीडा संघटनांना अल्प भाडय़ाने वापरण्यास देण्यात येत होती. मात्र …

महापालिका शाळांची मैदाने शाळा सुटल्यानंतर छोटय़ा-मोठय़ा क्रीडा संघटनांना अल्प भाडय़ाने वापरण्यास देण्यात येत होती. मात्र महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आता मैदानांच्या भाडय़ात हजारो रुपयांची वाढ करण्यात आली असून या नवीन भाडेदरामुळे महापालिका शाळांची मैदाने खेळांसाठी घेणे यापुढे खेळाडूंना अवघड होणार आहे.
शहरात महापालिकेच्या तीनशे शाळा असून बहुतेक सर्व शाळांना चांगली मैदाने आहेत. शाळा सुटल्यानंतर ही मैदाने खेळाडू तसेच क्रीडा संघटनांना अल्प भाडय़ाने तर काही ठिकाणी नि:शुल्क तत्त्वावर देण्यात येत होती. त्यामुळे अनेक मैदानांवर अनेक क्रीडा संघटना, क्लब तसेच खेळाडूंच्या वतीने क्रीडा प्रशिक्षणाचे वर्ग चालवणे शक्य होत होते. या वर्गाचा लाभ खेळाडूंना चांगल्या प्रकारे होतो. मात्र आता मैदानांच्या भाडय़ात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसे परिपत्रक महापालिका प्रशासनाने जारी केले असून या परिपत्रकानुसार भाडे द्यावे लागणार असल्यामुळे महापालिका मैदानांवरील खेळ व प्रशिक्षणाच्या उपक्रमांपुढे आव्हान उभे राहणार आहे.
मैदानांसाठी बाजारभावापेक्षा कमी भाडे आकारले जात असल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून अल्प तसेच दीर्घ कालावधीसाठी मैदाने वापरण्यास देताना त्यांच्या भाडय़ात वाढ करणे आवश्यक आहे, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिकेच्या मैदानांच्या भाडे दरात जशी वाढ केली जाणार आहे तशाच पद्धतीने महापालिकेच्या वर्गखोल्या वापरणाऱ्यांनाही यापुढे मोठी भाडेवाढ द्यावी लागणार आहे. ज्या छोटय़ा क्रीडा संघटना व क्लब मैदाने मासिक भाडय़ाने घेतात त्यांना मासिक ५० हजार रुपये द्यावे लागणार असून स्पर्धा व अन्य उपक्रमांसाठी मैदाने हवी असतील तर एका दिवसाला अडीच हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
सोमवारी संघटनांची बैठक
मैदानांच्या भाडेदरात जी वाढ करण्यात आली आहे त्या नव्या दरांबाबत तीव्र नाराजी असून शहरातील क्रीडा संघटना आणि महापालिका आयुक्त यांची एकत्रित बैठक सोमवारी महापालिकेत बोलावण्यात आली आहे.
शाळांची मैदाने; भाडय़ाचे नवे दर
मासिक भाडे- (अव्यावसायिक कारणासाठी)- ५० हजार रुपये
मासिक भाडे- (व्यावसायिक कारणासाठी)- एक लाख २५ हजार रुपये
एक दिवसाचे भाडे- (अव्यावसायिक कारणासाठी)- दोन हजार ५०० रुपये
एक दिवसाचे भाडे- (व्यावसायिक कारणासाठी)- पाच हजार रुपये
खेळाडूंसाठी चुकीचा निर्णय
महापालिका शाळांची मैदाने अल्प भाडय़ात क्रीडा संघटनांना देण्याऐवजी भाडे दरात मोठी वाढ करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा असून मुख्य सभेची परवानगी न घेता केवळ परिपत्रक काढून अशाप्रकारे भाडेवाढ करता येणार नाही. मैदानांचा वापर खेळाडूंनी करावा यासाठी पालिका शाळांची मैदाने दिली जातात. मात्र आता एवढे भाडे वाढवले आहे की कोणताही उपक्रम चालवणेच शक्य होणार नाही.
उपमहापौर आबा बागूल

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ground pmc income rate

ताज्या बातम्या