मागणीच्या तुलनेत आवक घटली; यंदा लागवडही कमीच

पुणे : सणासुदीत शेंगदाण्याला मागणी वाढत असून, दर कडाडले आहेत. आठवडाभरात शेंगदाण्याच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. मुळात भुईमुगाची लागवडच यंदा कमी झाली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ होत आहे. नव्या हंगामातील शेंगदाण्याची आवक नियमित होईपर्यंत ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

शेंगदाण्याचा हंगाम संपत आला असून, मार्केट यार्डातील भुसार बाजारात शेंगदाण्याची आवक कमी होत चालली आहे. एरवी दररोज आठ ते दहा गाडय़ांमधून शेंगदाणा विक्रीस पाठवला जायचा. गेल्या काही दिवसांपासून शेंगदाण्याची आवक पाच ते सहा गाडय़ांवर आली आहे. बाजारात कर्नाटकातून शेंगदाण्याची आवक सध्या होत आहे. गुजरातमधील शेंगदाण्याचा हंगाम अद्याप सुरू झाला नाही. सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात शेंगदाण्याच्या दरात दहा ते बारा रुपयांनी वाढ झाली आहे, असे शेंगदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. यंदा शेंगदाण्याची लागवड कमी झाली आहे. तेलाचे दरही कडाडले आहेत. तेल उत्पादकांना मोठय़ा प्रमाणावर शेंगदाण्याची विक्री करण्यात आली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यास, शेंगदाण्याची आवक नियमित होण्यास एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शेंगदाण्याचे दर चढे राहणार असल्याचे लोढा यांनी नमूद केले.

शेंगदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे. परदेशात शेंगदाण्याची निर्यात वाढली. तसेच तेलाचे दर चढे आहेत. त्यामुळे तेल उत्पादकांना शेंगदाणा विकण्याकडे शेतक ऱ्यांचा कल आहे.

शेंगदाण्याचे प्रतिकिलोचे दर

शेंगदाणा प्रकार       आठ दिवसांपूर्वीचे दर             सध्याचे दर

घुंगरू                      ९० ते ९२ रुपये               १०२ ते ११० रुपये

स्पॅनिश                  १०० ते १०२ रुपये            ११२ ते १२० रुपये

गुजरात जाडा            १०२ रुपये                      १२० रुपये