पुनर्विकास करण्यासाठी बालगंधर्व नाट्यगृह पाडले गेले तर नवे नाट्यगृह कधी उभे राहणार याची हमी द्यावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. पुणेकर रसिक आणि रंगकर्मींना आमंत्रित करून चर्चासत्र घडवून आणावे आणि त्यामध्ये महापालिका प्रशासनाने सर्वांना ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवरील कारकिर्दीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त संवाद पुणे संस्थेतर्फे कुलकर्णी यांच्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना कुलकर्णी यांनी बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या प्रश्नावर भाष्य केले.

एका सुसंस्कृत शहरातील नाट्यगृह बंद पडणे म्हणजे सांस्कृतिक चळवळीने काय गमावणे असते याची कल्पना मला आहे, याकडे लक्ष वेधून कुलकर्णी म्हणाले, मुंबईमधील चार नाट्यगृह बंद आहेत. नाट्यव्यवसायातील कलाकारांचा बालगंधर्व रंगमंदिर हा केंद्रबिंदू आहे. रंगकर्मींसाठी हा प्रश्न अत्यंत

संवेदनशील आहे. राजकारण्यांना आपली भीती वाटेनाशी झाली आहे ते आपल्याला गृहीत धरत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या शेजारील बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडले आहे. शहरातील विकासकामांचा सांस्कृतिक चळवळीवर काय परिणाम होतो हे पाहायला हवे. निवडणूक झाल्यानंतर सत्ता बदलली की प्राधान्यक्रम बदलणार. त्यामुळे सांस्कृतिक जीवनाची गतिमानता न रोखता काय करता येईल याचा विचार झाला पाहिजे.

राजकीय कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाच्या तारखा काढून घेतल्या जातात. हे ध्यानात घेता राज्यातील प्रत्येक शहरामध्ये राजकीय कार्यक्रमांसाठी दोन नाट्यगृहे उभारली जावीत, अशी टिप्पणी कुलकर्णी यांनी केली.

नाट्यमहोत्सवाची पर्वणी

टि‌‌ळक स्मारक मंदिर येथे गुरुवारी (२६ मे) सायंका‌ळी पाच वाजता नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते चंद्रकांत कुलकर्णी यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर आविष्कार निर्मित महेश एलकुंचवार यांच्या ललित लेखनावर आधारित ‘मौनराग‘ हा नाट्याविष्कार अभिनेते सचिन खेडेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी सादर करणार आहेत. २७ ते २९ मे असे तीन दिवस ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ‘संज्याछाया’ या तीन नाटकांचे बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे प्रत्येकी दोन प्रयोग होणार आहेत, अशी माहिती संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी दिली.