पुणे : गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी घरखरेदी करण्यास ग्राहक पसंती देतात. तसेच, या मुहूर्तावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याकडे विकासकांचा कल असतो. यंदा गुढीपाडव्याला राज्यात एक हजाराहून अधिक गृहप्रकल्पांना ‘महारेरा’ने मंजुरी दिली असून, त्यात सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यातील आहेत. नवीन गृहप्रकल्पांच्या नोंदणीत पुण्याने आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे.

यंदा पाडव्याच्या पार्श्वभूमीवर महारेराककडे विकासकांकडून गृहनिर्माण प्रकल्पांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे ‘महारेरा’कडून गृहप्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. त्यासाठी ‘महारेरा’चे मनुष्यबळ सुटीच्या दिवशीही कार्यरत होते. राज्यातील १ हजार ६० प्रकल्पांना पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंजुरी देण्यात आली. त्यात ४८६ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना ‘महारेरा’ने नोंदणीक्रमांक दिले आहेत.

विकासकांनी केलेल्या विनंतीनुसार ४२६ प्रकल्पांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच, १४८ जुन्या प्रकल्पांतील सुधारणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पाडव्याच्या एक दिवस आधी २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात १२४ प्रकल्पांना नोंदणीक्रमांक देण्यात आले असून, ५३ प्रकल्पांना मुदतवाढ आणि ३४ प्रकल्पांच्या प्रस्तावातील सुधारणांनाही मंजुरी देण्यात आली, अशी माहिती ‘महारेरा’ने दिली.

महारेरा नोंदणीक्रमांक मिळालेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई महानगर विभागातील ६०७ प्रकल्प असून, पुणे विभाग ३२१, खानदेश विभाग ६३, विदर्भ विभाग ५०, मराठवाडा विभाग १४ आणि दादरा नगर हवेली विभागातील ५ प्रकल्पांचा समावेश आहे. गृहप्रकल्पांच्या संख्येत पुणे जिल्ह्याने २८६ प्रकल्पांसह आघाडी घेतली असून, त्यानंतर मुंबई उपनगर १९६ प्रकल्प, ठाणे १८५ प्रकल्प आणि रायगड जिल्हा ११० प्रकल्प आहेत.

निर्धारित केलेल्या कायदेविषयक, तांत्रिक आणि आर्थिक निकषांची काटेकोर छाननी करून त्याची पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी ‘महारेरा’ प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘महारेरा’च्या नोंदणी विभागाची यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे, असे ‘महारेरा’ने स्पष्ट केले.

सर्वाधिक प्रकल्प असलेले जिल्हे

  • पुणे – २८६
  • मुंबई उपनगर – १९६
  • ठाणे – १८५
  • रायगड – ११०

पुणे विभागातील जिल्हानिहाय प्रकल्प मंजूरी

  • पुणे – २८६
  • सातारा – १६
  • कोल्हापूर – १३
  • सांगली – ५
  • सोलापूर – १