पुणे : एका महिलेला हाता-पायात झिणझिण्या येऊ लागल्या. नंतर हा त्रास गंभीर होत जाऊन तिच्या स्नायूंमधील कमकुवतपणा वाढत गेला. त्यातून तिला साधी हालचालही करता येणे अवघड बनले. अखेर तपासणीत तिला गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ विकाराचे निदान झाले. डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीपणे उपचार केल्याने तिने या विकारावर आता मात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही महिला ६५ वर्षांची आहे. तिला सुरुवातीला हाता-पायांत झिणझिण्या येऊ लागल्या. हा त्रास हळूहळू गंभीर होऊन तिच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवू लागला. त्यामुळे तिला हालचाल करणेही अशक्य झाले. तिला कंबरदुखी, सौम्य ताप आणि हलक्या स्वरूपाचे जुलाबही सुरू झाले. त्यामुळे तिला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्या मेंदू आणि मणक्याचे स्कॅन करण्यात आले, परंतु त्यातून ठोस निदान झाले नाही. मात्र, स्पायनल फ्लुईड चाचणीत अल्ब्युमिनोसाइटोलॉजिकल डिसोसिएशनचे निदान झाले. त्यातून तिला गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) निष्पन्न झाले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडची ‘कचरा कोंडी’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीमुळे महापालिका अडचणीत

याबाबत डॉ. परेश बाबेल म्हणाले, ‘सखोल तपासणीनंतर रुग्णाला गुइलेन बॅरे सिंड्रोम असल्याचे निदान झाले. हा एक दुर्मीळ विकार असून, यात रुग्णाची प्रतिकारशक्ती परिघीय चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा निर्माण होतो. आम्ही त्वरित इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन उपचार सुरू केले. यामुळे प्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यात आणि पुढील नुकसान टाळण्यात यश मिळाले. उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी रुग्णाच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला. तिला श्वसनास अडचण येऊ लागली. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर हळूहळू तिचे श्वसन पूर्ववत करण्यात आले.’

डॉ. संगीता ठाकरे म्हणाल्या, ‘ही महिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाली, त्या वेळी तिची स्थिती अत्यंत गंभीर होती. ती शुद्धीत होती, परंतु शरीराच्या वरच्या भागात मर्यादित ताकद होती, तर खालच्या भागात जवळपास शक्तीच उरली नव्हती. श्वासोच्छ्वास सुरुवातीला स्थिर असला, तरी ती श्वास दीर्घकाळ धरून ठेवू शकत नव्हती. हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ती तिसाव्या दिवशी वॉकरच्या मदतीने उभे राहू लागली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.’

हेही वाचा – पुणे : स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले, बनावट आधारकार्ड, पारपत्र जप्त

काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे. तो दर वर्षी १ लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guillain barre syndrome gbs is a rare disease in women health news pune print news stj 05 ssb