आर्थिक वर्ष संपताना पुढील वर्षीच्या आर्थिक नियोजनात बचतीचाही तितकाच मोठा वाटा असायला हवा, ही जाणीव लहान मुलांमध्ये रुजावी, यासाठी ‘सेवा सहयोग’ या सामाजिक संस्थेमार्फत ‘गुल्लक’ हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाविषयी ‘सेवा सहयोग’च्या ‘स्वयंसेवक जोडणी प्रकल्पा’च्या प्रमुख देविका सरदेशपांडे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

‘गुल्लक’ ही संकल्पना काय आहे?

‘गुल्लक’ ही संकल्पना मुलांना बचतीची ओळख करून देणे, महत्त्व सांगणे व ही एक सवय म्हणून रुजवण्यावर आधारित आहे. आपल्या लहानपणी मातीच्या भांड्यात (गुल्लक) आपण खाऊचे उरलेले पैसे किंवा पाहुण्यांकडून मिळालेले पैसे साठवत असू. त्याच अनुभवावर आधारित, आजच्या पिढीतील मुलांमध्ये बचतीचे महत्त्व निर्माण करण्यासाठी या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली. ‘माझी बचत – माझी ताकद’ हा या उपक्रमाचा मुख्य संदेश आहे.

ही संकल्पना कशी सुचली?

ही संकल्पना ‘सेवासहयोग’मधील कार्यकर्ते प्रसाद शिरसीकर यांना सुचली. सतत काही तरी मागण्याची प्रवृत्ती आजच्या मुलांमध्ये वाढते आहे. बाजारात नवीन काही आले, अथवा कोणाकडे ते पाहिले, की ते लगेच मुलांना हवे असते. बचतीच्या मूल्यांविषयी त्यांची कमी होत असलेली जाणीव लक्षात घेऊन त्यांनी या संकल्पनेचा विचार केला. त्यातून पारंपरिक मातीच्या गुल्लकला पर्याय म्हणून टिकाऊ लाकडी गुल्लक तयार करण्याची कल्पना विकसित झाली. त्याचा पुनर्वापरही करता येणे शक्य आहे.

हा प्रकल्प कसा चालतो?

या प्रकल्पात तीन स्तरांवर काम केले जाते. पहिले म्हणजे उपजीविका निर्माण (लाइव्हलीहूड). यात सुतारकामाचे प्रशिक्षण देऊन गरजू युवकांना लाकडी गुल्लक तयार करण्याची संधी दिली जाते. दुसऱ्या स्तरात स्वयंसेवक सहभागी होतात. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील स्वयंसेवक हे गुल्लक आकर्षक पद्धतीने रंगवतात आणि त्यावर मुलांच्या दृष्टीने आकर्षक चित्रांबरोबरच बचतीचे संदेश व प्रेरणादायी विचार लिहितात. तिसरे, म्हणजे मुलांशी संवाद साधणे. याद्वारे इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांना बचत करण्यासाठी सक्षम बनवले जाते. त्यांना ‘गुल्लक’बरोबर माहिती पुस्तिका आणि प्रश्नावली दिली जाते. याद्वारे मुलांना बचत, बँक प्रणाली व सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) या संदर्भात माहिती दिली जाते. हे सत्र संवादात्मक ठेवण्यावर भर असतो. स्वयंसेवक त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊन मुलांना बचतीच्या गोष्टी सांगतात, बचतीमुळे झालेल्या आर्थिक फायद्याचे अनुभव सांगतात. याद्वारे मुलांमध्ये बचत का व कशी करायची, तसेच ‘गुल्लक’नंतरचा टप्पा म्हणून बँक अथवा ‘पीपीएफ’चा बचतीसाठी वापर कसा करायचा, याबद्दल संकल्पना स्पष्ट होण्यास व त्यांच्या स्वप्नांसाठी बचत करण्यास प्रोत्साहन मिळते.

ही संकल्पना मुलांपर्यंत कशी पोहोचविता?

शाळांच्या माध्यमातून आणि ‘सेवा सहयोग’च्या अभ्यासिकांद्वारे हा उपक्रम मुलांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. स्वयंसेवक मुलांशी संवाद साधून, गोष्टी सांगून आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवांद्वारे बचतीचे महत्त्व पटवून देतात. ‘माझी बँक- माझी बचत’ आणि ‘पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळविणे’ हे संदेश मुलांपर्यंत सोप्या आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने पोहोचवले जातात.

मुलांना या उपक्रमाचा उपयोग कसा झाला?

मुलांना बचतीचे महत्त्व, संयम आणि नियोजन या मूल्यांची शिकवण उपयोगी पडते आहे. पूर्वी खाऊसाठी मिळालेले पैसे लगेच खर्च करणारी मुले आता स्वतःहून पैसे साठविण्याचा संकल्प सोडतात. काही मुले पुढील भेटीत स्वतःहून त्यांच्या बचतीबद्दल सांगतात, तर काही मुले त्यांनी साठविलेल्या पैशांचा कसा उपयोग केला, हेदेखील सांगतात. अनेक मुलांनी साठविलेल्या पैशांचा उपयोग शैक्षणिक गरजांसाठी, शालेय साहित्य खरेदीसाठी किंवा छोट्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी केला. मुलांमुळे काही कुटुंबांतील इतर सदस्यदेखील बचतीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागली. यामुळे मुलांमध्ये आर्थिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. स्वावलंबनाची पहिली पायरी त्यांनी गाठली आहे.

shriram.oak@expressindia.com