एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते मागील काही दिवसांपासून विविध वादांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने सदावर्ते यांना नुकताच जामीन मंजूर केला आहे. दरम्यान सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यासह कोल्हापूर, बीड आणि इतर काही ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात देखील एक गुन्हा दाखल होता.

याप्रकरणी आज भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. जबाब नोंदवून झाल्यावर गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
गुणरत्न सदावर्ते यांनी २०२० मध्ये एका वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल आक्षेपार्ह विधानं केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आज सकाळी नऊच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आले होते. पोलीस ठाण्यात जबाब देणं सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पुराणिक म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांचा काल आणि आज जबाब नोंदवण्यात आला आहे. हा जबाब ऑन कॅमेरा झाला असून त्यांच्या आवाजाचे नमुने देखील तपासासाठी घेण्यात आले आहेत.