आपण ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वसमावेशक असल्यामुळे आपल्याला आनंद तर मिळतोच, पण त्यापासून आपल्याला ज्ञानही मिळते. जीवनातील सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी ज्ञानेश्वरी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षणपर कार्यक्रमात पानेगांवकर बोलत होते.
डॉ. पानेगांवकर महाराज म्हणाले, ‘‘आजच्या काळात ज्ञानेश्वरीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीच्या किमान पाच तरी ओव्या वाचायला हव्यात. ज्ञानेश्वरी व त्या प्रकारच्या ग्रंथांच्या आधारावर वारकरी संप्रदाय उभा आहे. त्यामुळे वारीच्या काळात कुठलेही अनिष्ट प्रकार घडताना दिसत नाहीत, ही संतांची पुण्याई आहे. सदाचरणाचे वातावरण भरून राहिलेले दिसते. सर्व वारकरी एकमेकाला ‘माउली’ या नावाने पुकारतात. तेथे जातीधर्म तर सोडाच, पण स्त्री-पुरुष हा भेदसुद्धा नसतो. एकाच कुटुंबातले सर्वजण एकमेकाला माउली म्हणतात. सर्व मानवजातीची एकात्मता येथे आध्यात्मिक पातळीवरून अनुभवली जात असल्याचे दिसते.’’प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ‘‘वारी जीवनाला आकार देते. काम, क्रोध, मद, मत्सर, विकार आणि विकृती या षडरिपूंवर विजय मिळवायचा असेल, तर वारीत सहभागी झाले पाहिजे. कारण वारी हे चालते-बोलते विद्यापीठ आहे.’’कार्यक्रमात चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. योजना शिवानंद पाटील व सहकारी यांचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा अभंगवाणीचा कार्यक्रमही आयोजित केला होता.