पिंपरी : मागील पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता ‘एच३ एन२’ विषाणूमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ‘एच३ एन२’मुळे शहरातील मृतांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. पिंपरी-चिंचवड शहरात एक जानेवारीपासून ‘एच ३ एन २’ बाधित १७ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. १६ मार्च रोजी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत एकही रुग्ण शहरात नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. हेही वाचा >>> पिकअप टेम्पोच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या एकाच कुटुंबातील पाच ठार, एक गंभीर जखमी शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. करोनामुळे यापूर्वी चार हजार ६३० व्यक्तींचा बळी गेला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे सुमारे ३५१ कोटी ८२ लाख ७५ हजार ९२० रुपये खर्च केले आहेत. एका रुग्णामागे सरासरी नऊ हजार ४३४ रुपये खर्च आला आहे. मागील वर्षभरापासून करोनाच्या रुग्णसंख्येत पूर्णपणे घट झाली होती. ९ मार्चपर्यंत शहरात एकही सक्रिय रुग्ण नव्हता; परंतु मागील १५ दिवसांपासून पुन्हा रुग्ण आढळत आहेत. रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे गृहविलगीकरणातच उपचार घेऊन बरे होत आहेत. मागील आठ दिवसांत शहरातील दोन हजार २६२ जणांनी करोनाची चाचणी केली. त्यापैकी २५५ जणांचे अहवाल सकारात्मक आले. या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे होती. त्यामुळे घरीच उपचार घेवून बरे होत आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण करोनामुक्त होत आहेत. आजपर्यंत १३६ जण करोनामुक्त झाले. सद्यस्थितीत शहरात ११९ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील केवळ तीन रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. करोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ आहे. रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. गृहविलगीकरणात राहून रुग्ण बरे होत आहेत. सद्यस्थितीत तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य विभागप्रमुख. पिंपरी-चिंचवड महापालिका