पुणे : गैरसमजातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करणाऱ्या दोघांना सत्र न्यायाधीश एस. आर. अग्रवाल यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अमोल बाळासाहेब बोरकर (वय ३३), सागर विजय काळे (वय ३३, दाेघे रा. काळेपडळ, हडपसर) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. २५ जून २०१८ रोजी बोरकर आणि काळे यांनी प्रतीक सपकाळ (वय २०) याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. दोघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत प्रतीकचे वडील मारुती सपकाळ यांनी फिर्याद दिली होती.

प्रतीक याचा मित्र आराेपींच्या घराशेजारी राहायला आहे. प्रतीक मित्राला भेटायला गेला होता. दुचाकीस्वार प्रतीक याने हाॅर्न वाजविला होता. प्रतीक याने नात्यातील तरुणीला पाहून हाॅर्न वाजविला, असा गैरसमज आरोपींमध्ये झाला. त्यानंतर आरोपींनी गैरसमजातून हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटर येथे प्रतीकवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली.

आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती ॲड. तरळगट्टी यांनी युक्तिवादात केली होती. न्यायालयाने साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन दोघा आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.