पुणे : आंब्याची पेटी मागविल्यानंतर पैसे देण्यावरुन वाद झाल्याने संगणक अभियंत्याने पत्नीला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध हडपसर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४७ वर्षीय संगणक अभियंता पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. २३ मे रोजी हडपसरमधील साडेसतरा नळी परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने सोसायटीच्या समोर असलेल्या एका स्टाॅलवरुन दोन डझन आंबे खरेदी केले. तिने आंब्याची पेटी घरी मागविली. दोन डझनाची पेटी घरी मागविल्यानंतर पैसे घेण्यासाठी आंबे विक्रेता घरी आला. त्यानंतर महिलेचा पती घरी आला. ‘तुला सोडून देणार आहे, तसेच घर सोडून जाणार आहे. आंब्याच्या पेटीचे पैसे मी का देऊ?’ असे सांगून त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. महिलेने मोबाइलवरुन चित्रीकरण केले. त्यामुळे पती चिडला आणि त्याने पत्नीच्या हातातील मोबाइल संच हिसकावून घेतला. मोबाइल संच पत्नीला फेकून मारल्याने तिच्या भुवईला दुखापत झाली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.

अल्पवयीन पुतण्याला दुचाकी देणाऱ्या काकाविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन पुतण्याला दुचाकी चालविण्यास दिल्या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दुचाकीमालक काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अल्पवयीन पुतण्या दुचाकीवरुन ‘ट्रिपल सीट’ निघाला होता. नाकाबंदीत तो पोलिसांना सापडला होता.

याबाबत पोलीस कर्मचारी किरण जाधव यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीमालक काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिसांनी २२ मे रोजी रात्री एनडीए पोलीस चौकीसमाेर नाकाबंदी केली होती. नाकाबंदीत एक युवक दुचाकीवरुन ‘ट्रिपल सीट’ निघाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. पुतण्या अल्पवयीन असताना त्याला दुचाकी चालविण्यास दिली. मोटार वाहन कायद्यान्वये काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर अल्पवयीनांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या वाहन मालकांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अल्पवयीनांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची अनेकांना माहिती नसते.