पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी वैष्णवीचा पती आणि सासू यांच्याविरुद्ध ‘जेसीबी’ मशिनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जेसीबी मशीन जप्त केले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निघोजे, ता. खेड) यांनी २९ मे रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शशांक राजेंद्र हगवणे आणि त्याची आई लता (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता हगवणेच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजारांची रक्कम प्रशांत हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता जेसीबी मशीन प्रशांत यांच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतले. प्रशांत हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले. त्यावेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात प्रशांत यांना ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर्थिक फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासकामी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शशांक आणि लता यांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे.