पुणे : वाढती स्पर्धा, धकाधकीचे आयुष्य आणि ताणतणाव यांमुळे निम्म्या भारतीयांना निद्रानाशाने घेरले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे किंवा रात्रभर जागून काम करणे आणि दिवसा झोपणे ही बाब भारतीयांच्या नव्या दिनक्रमाचा भाग होत चालली आहे, त्याचाच परिणाम म्हणून खंडित निद्रेचा विकार (स्लीप ॲप्निआ), मधुमेह असे विकास जडले आहेत.
औषध आणि वैद्यकीय तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या रेसमेड या खासगी संस्थेने देशाच्या कानाकोपऱ्यातील काही हजार नागरिकांच्या मुलाखतींमधून त्यांच्या झोपेच्या बदललेल्या आणि बिघडलेल्या वेळापत्रकाचा अभ्यास या सर्वेक्षणातून केला आहे. तब्बल ८१ टक्के भारतीयांनी झोपेची गुणवत्ता जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करत असल्याचे यावेळी नमूद केले, मात्र रोजच्या जगण्यातील वाढते ताणतणाव, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, मोबाइल आणि इतर उपकरणांचा वापर यांमुळे झोपेवर परिणाम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बहुतेक नागरिकांनी झोप येण्यास सरासरी ९० मिनिटांचा वेळ लागत असल्याचे सांगितले. तब्बल ५९ टक्के नागरिकांना घोरण्याचा त्रास आहे. ७२ टक्के नागरिकांची झोप कमी आहे. त्यामुळे त्यांना विविध मानसिक विकारांचा सामनाही करावा लागत असल्याचे सर्वेक्षणात सहभागी नागरिकांनी नोंदवले आहे. शरीराला पुरेशी झोप, पर्यायाने विश्रांती न मिळाल्याने शरीर जास्त वेळ कार्यरत राहते. त्याचा परिणाम रक्तातील साखरेच्या प्रमाणावर होतो, त्यामुळे झोपेच्या तक्रारी असलेल्या नागरिकांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता अधिक असल्याचे रेसमेडतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. झोपेच्या तक्रारी आणि त्यामुळे उद्भवणारा मधुमेह, ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निआ यांचा त्रास ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील नागरिकांमध्ये अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. करोना महामारीच्या काळात नोकरी-व्यवसायातील अनिश्चितता हेही निद्रानाशाचे एक प्रमुख कारण ठरल्याचे दिसून आले.
खंडित निद्रा विकाराची कारणे, लक्षणे

  • धूम्रपान, मद्यपान
  • महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल
  • मानसिक आरोग्याच्या तक्रारी
  • ताणतणाव, स्पर्धा, वर्तनाच्या समस्या
  • मोबाइल, गॅजेट्सचा अतिरेकी वापर
    चांगल्या झोपेसाठी
  • चालणे, योगासने किंवा कोणताही व्यायाम नियमित करा
  • झोपण्यापूर्वी किमान तासभर मोबाइल आणि गॅजेट्सचा वापर कमी करा
  • दैनंदिन जगण्यात चौरस आहाराचा समावेश करा