पुणे : हमीद दलवाई यांची धर्मवादाची भूमिका ही निखळ बुद्धिवादी आणि विज्ञानाची होती. ज्यांना धर्मचिकित्सा करायची आहे, समाज सुधारणा करायची त्या सर्वांसमोर आता हिंदुत्वाचे आणि धर्मवादाचे आव्हान आहे. तर दुसरीकडे विज्ञान हा धर्माचा विरोधक नाही तर धर्मामध्ये अंतर्गत एक विरोध प्रवाह आहे. असा सूर पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात मान्यवरांनी लावला.
सत्यशोधक हमीद दलवाई आणि दिनकरराव जवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने सत्यशोधक हमीद दलवाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ ; प्रेरणा आणि प्रवास या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारी समितीचे सदस्य डॉक्टर हमीद दाभोलकर, लेखिका आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक चैत्रा रेडकर, अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभेचे अध्यक्ष डॉक्टर शरद जावडेकर, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब जाधव आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुधारणावादी विचार पुढे न्यायचे असतील तर समाजाला छोटे छोटे कृती कार्यक्रम देणे गरजेचे आहे असे मत हमीद दाभोलकर यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केले.
आपण तंत्रज्ञान स्विकारले. विज्ञान स्विकारले पण वैज्ञानिक दृष्टीकेन स्विकारला नाही. त्यामुळे अशा प्रतिकुल परिस्थितीत विचार जिवंत ठेवणे हेच आपल्यासमोर आव्हान आहे. असे मत जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणात जावडेकर यांनी केलेल्या मुद्द्यांना विरोध करत धर्माचा विरोधक विज्ञान नसून प्रत्येक धर्मात विरोधी अंतर प्रवाह आहेत तेही लक्षात घ्यायला हवेत असेही नमूद केले.
यावेळी शमशुद्दीन तांबोळी यांनी आपल्या भाषणात हमीद दलवाई कधीच संपणार नाही. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे नमूद करत मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना, जडणघडण आणि बदलते विचारप्रवाह यांचाही त्यांनी आढावा घेतला.
