पुणे : हडपसरमधील हांडेवाडी परिसरात असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश मार्गदर्शन संस्थेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याने पैसे चोरीचा आरोप केल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित संस्थेचे संचालक, कार्यकारी अधिकारी, तसेच वसतिगृह पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत त्याच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावर संबंधित संस्थेचे प्रशिक्षण वर्ग आहे. या संस्थेत वसतिगृहाची सुविधा आहे. बीडमधील १६ वर्षीय विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत होता. १० नोव्हेंबर २०२५ रोजी त्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संस्थेत एनडीए परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी अकरावीत होता. त्याच्याबरोबर राहणाऱ्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने साडेतीन हजार रुपये चोरल्याचा आरोप केला हेता. त्यानंतर वसतिगृहातील पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्याला संस्थेतून काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून तो नैराश्यात होता. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सुुरवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. संबंधित संस्थेतील संस्थापक, कार्यकारी अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पालकांना दिली नव्हती. त्यांनी मुलाचे समुपदेशन केले नाही. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली. त्याचे समुपदेशन न करण्यात आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले अहो. पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव तपास करत आहेत.
