तंत्रज्ञान हाताशी असल्याने हातात पेन धरून कागदावर काही लिहिणे आता दुर्मीळ होत चालले आहे. पण, सुंदर हस्ताक्षर हा व्यक्तिमत्त्व विकसनाच्या प्रवासातील महत्त्वाचा मुक्काम आहे. त्याचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी ‘सुमन सुलेखन प्रतिष्ठाना’च्या माध्यमातून जनजागृती करणारे सुधीर इनामदार यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
चांगल्या अक्षराचे फायदे काय आहेत?
व्यक्तिमत्त्व आपोआप सुधारते. टापटीप, व्यवस्थितपणा, सातत्य या गोष्टी अंगवळणी पडतात. त्यामुळे त्याच्याशी तुलना होत असल्याने इतर गोष्टींमध्येही सुधारणा होते. आपली समोरच्यावर चांगल्या पद्धतीने छाप पडते. स्वतः लिहिलेल्या मजकुरातील शुभेच्छापत्रांमुळे वैयक्तिक आपुलकी येते.
सुंदर हस्ताक्षराची व्याख्या काय? ते करण्यासाठी काय करावे?
जे रेखीव, वळणदार, एकसारखे आणि महत्त्वाचे म्हणजे प्रमाणबद्ध असते, त्याला सुंदर अक्षर म्हणता येईल. सुंदर अक्षरात लिहिता येण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची गरज असते – इच्छा, प्रयत्न आणि मनापासून केलेला सराव. त्यानंतर मुद्दा येतो तो पेन-पेन्सिल हातामध्ये धरण्याचा. पेन किंवा पेन्सिल पहिल्या तीन बोटांत म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मध्यमेत धरावी. पेन्सिलीला सहा बाजू असतात. त्यांपैकी एकाआड एक बाजूवर एकेक बोट ठेवावे. सर्व बोटांची टोके एकाच ओळीत असावीत, मागे-पुढे नसावीत. अनामिका म्हणजेच चौथ्या बोटाचा लेखनात काही उपयोग नसतो. मनगटाचे करंगळीच्या खालचे तळहाताचे हाड नीट टेकवून करंगळीच्या आधाराने लेखन करावे. तीन बोटांमध्ये पेन्सिल हलक्या हाताने धरावी. इतकी, की ती मागून ओढली असता फारसा त्रास न होता काढून घेता यायला हवी. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे तिन्ही बोटे बाह्य वर्तुळाकार असावीत. आतल्या बाजूला दाबलेली नसावीत. पेन्सिलीचा टोक केलेला संपूर्ण भाग दिसेल अशा अंतरावर म्हणजे टेकलेल्या टोकापासून अर्धा ते पाऊण इंच (म्हणजे १५ ते २० मिलिमीटर अंतरावर) पेन्सिल, बॉलपेन, फाउंटन पेन या गोष्टी हातात धराव्यात. हलक्या बोटाने पेन, पेन्सिल धरल्यामुळे मनगटाच्या हाडाच्या आधाराने फक्त तीन बोटांच्या पकडीतून उभी-आडवी-तिरकी रेघ किंवा वर्तुळ – तेही दोन्ही बाजूंनी – सहज काढता येते. पेन, पेन्सिलीचा वहीशी ४५ अंशांचा कोन असावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही दाबून न लिहिता हलक्या हाताने लिहावे.
लेखन करताना बैठक कशी असावी?
वहीवर पुरेसा प्रकाश यावा यासाठी समोरून, डाव्या बाजूने उजेड येणे आवश्यक आहे. डाव्या हाताने लिहिणाऱ्यांनी समोरून अथवा उजव्या बाजूने उजेड यावा असे बसावे. जमिनीवर बसताना ताठ बसावे. वही आणि आपले डोळे (डोके) यामध्ये किमान ७-८ इंचांचे अंतर असावे. जमिनीवर बसून लिहिताना मांडीवर पॅड घ्यावे किंवा टेबल असल्यास ते आपल्या कंबरेइतक्याच उंचीचे असावे, टेबल-खुर्चीचा वापर करायचा असल्यास टेबलची उंची आपल्या कोपराच्या उंचीपेक्षा जास्त नसावी. शिरोरेषा, मात्रा, वेलांटी यांना सुंदर हस्ताक्षरामध्ये महत्त्व असून, ते अभ्यासाने आणि सरावाने जमू शकते. अक्षराचे अवयव प्रमाणबद्ध आणि योग्य स्वरूपात यावेत, यासाठी जो सराव करावा लागतो त्याला अक्षर ‘घोटणे’ असे म्हणतात. देवनागरी लिपीमधील ६५ ते ७० टक्के अक्षरे शिरोरेषेपासून सुरू होतात, त्यामुळे पहिल्या अक्षरावरील शिरोरेषा पकडून तिलाच जोडून पुढचे अक्षर सुरू करता येते. असे काही महत्त्वाचे नियम पाळल्यास अक्षर सुंदर होऊ शकते.
मन:स्थितीचा आणि अक्षराचा काही संबंध असतो का ?
अक्षर हा स्वभावाचा किंवा मन:स्थितीचा आरसा आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे थोडे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते, की सरळ स्वभावाच्या माणसांची अक्षरे सरळ येतात. तिरकस स्वभाव, तिरके, बढाईखोर माणसे – मोठेमोठे/गोलगोल, गुंतागुंतीचा स्वभाव – गिचमीड, अनाकलनीय स्वभाव – असमान अक्षरे, सरळमार्गी मनुष्य – सरळ ओळीत लेखन, प्रगतिशील वृत्ती – वर वर जाणाऱ्या ओळी, असे ठोकताळ्याच्या स्वरूपात लक्षात येते. लिहिताना मन अस्थिर, चंचल असेल, तर आणि मनातल्या विचारांचा आणि लिखाणाचा वेग जुळला नाही, तर लिखाणात खाडाखोड होते. लिखाणात सातत्य नसेल, तर अक्षरे सुरेख (सुवाच्य), मध्यम (वाच्य), कसे तरी (दुर्वाच्य) आणि शेवटी गचाळ/घाणेरडे (अर्वाच्य) अशी येतात.
