सात महिन्यांपासून पगार नाही, कंपनी सुरू राहणार की बंद पडणार, अशा अनेक प्रश्नांमुळे चिंतेत असलेल्या पिंपरीतील एचए कंपनीच्या कामगारांना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंजराज अहिर यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेटीत दिलासा दिला. आवश्यक उपाययोजना करून आर्थिक विवंचनेतील ‘एचए’ला पूर्ववैभव प्राप्त करून देऊ आणि येत्या दहा दिवसांत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही त्यांनी कामगारांच्या सभेत बोलताना दिली.
‘एचए’ला भेट देऊन अहिरांनी कंपनीच्या परिस्थितीची पाहणी केली. संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, कामगारांशी संवाद साधताना ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एचए कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. वर्की, युनियनचे सरचिटणीस सुनील पाटसकर आदी उपस्थित होते.
अहिर म्हणाले, ‘एचए’चे कामगार त्रस्त आहेत, त्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. दहा वर्षांपासून ‘एचए’ची अवस्था वाईट आहे. तीन हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या कंपनीत १०५८ कामगार राहिलेत. कंपनी वाचवण्यासाठी विजेचे दर कमी करण्यासारखे महत्त्वाचे उपाय योजावे लागणार आहेत. कंपनीला मदत म्हणून मिळणारे पॅकेज फक्त कर्ज फेडण्यासाठी नको. सर्व मुद्दय़ांचा विचार व्हायला हवा. ‘पीपीपी’ करा, ‘म्हाडा’ला जमीन द्या, सरकारची मदत घ्या किंवा सरकारची हमी घेऊन कर्ज काढावे, असे अनेक मुद्दे सुचवण्यात आले. त्या सर्व बाबींचा विचार करू. सर्वाना विश्वासात घेऊन सकारात्मक पाऊल टाकू आणि कंपनीला पूर्ववैभव मिळवून देऊ. एवढा मोठा आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प बंद पडता कामा नये, यासाठी त्याला चालना देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या वेळी श्रीरंग बारणे, गौतम चाबुकस्वार, मेधा कुलकर्णी, वर्की, पाटसकर यांची भाषणे झाली.
ताटकळलेले कामगार अन् वादावादी
मंत्री महोदयांची कंपनीतील बैठक बरीच लांबल्याने प्रवेशद्वारासमोरील सभेसाठी थांबलेले कामगार ताटकळले, अनेकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर, प्रवेशद्वारावरील सभाही लांबली. त्यामुळे विश्रामगृहातील नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली व कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळातच पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मंत्री महोदय बैठकीत असताना भाजप पदाधिकारी व कामगारांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्याचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.