६० ते १२० रुपये किलो दराने उपलब्ध; बार्शी, इंदापूर भागांतून पुरवठा

आकाराने ओबडधोबड, चवीला आंबटगोड, आणि आइस्क्रीमप्रमाणे गार असलेले हनुमान फळ अनेकांना माहीत नसते. सोलापूर जिल्हय़ातील बार्शी आणि इंदापूर परिसरातून गुलटेकडीतील मार्केट यार्डात हनुमान फळाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक ग्राहकांसह मुंबई, हैदराबाद, गुजरात परिसरातून मोठी मागणी आहे. हनुमान फळाचा एक किलोचा भाव साठ ते एकशेवीस रुपये आहे. ओबडधोबड आकाराचे हनुमान फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हनुमान फळ सीताफळाप्रमाणे असून चवीला आंबटगोड आहे, मात्र सीताफळ आणि हनुमान फळाच्या गरात फरक आहे. हनुमान फळाचा गर मऊ आहे. हनुमान फळाचा गर आइस्क्रीमसारखा चमच्याने खाता येतो. मार्केट यार्डातील फळ बाजारात हनुमान फळाची आवक बार्शी आणि इंदापूर भागातून होत आहे. हनुमान फळाचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान असतो. फळ बाजारात तीन किलो वजनाच्या वेष्टनात हनुमान फळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तीन किलो वजनाच्या वेष्टनात साधारणपणे तीन ते नऊ फळे बसतात, अशी माहिती फळ बाजारातील विक्रेते रावसाहेब कुंजीर यांनी दिली.

बार्शी भागातून गोल्डन सीताफळांची आवक चांगली होत आहे. दरारोज चार टन गोल्डन सीताफळांची आवक होत आहे. गावरान सीताफळांच्या तुलनेत गोल्डन जातीचे सीताफळ टिकाऊ आहे. गोल्डन सीताफळांचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहील. परराज्यातील व्यापाऱ्यांकडून गोल्डन सीताफळाला मागणी आहे, असे कुंजीर यांनी सांगितले.

बार्शी भागातील हनुमान फळाचे उत्पादक शेतकरी राजेंद्र देशमुख म्हणाले, की हनुमान फळाचे वजन शंभर ग्रॅमपासून दीड ते दोन किलो असते. सीताफळ आणि रामफळासारखे हनुमान फळ आहे. एका झाडाला सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनाची फळे असतात. सीताफळांमध्ये बियांचे प्रमाण जास्त असते. त्या तुलनेत हनुमान फळात बियांचे प्रमाण कमी असते. या फळाची चव अननसासारखी आंबटगोड असते. या फळांची आवक सुरू झाली असून सध्या आवक निम्मी आहे.