Anand Mahindra praises PMC Pune footpath: पुणे महानगरपालिकेने शहरातील पदपथांच्या (फुटपाथ) दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षित आणि चालण्यायोग्य पदपथ मिळावेत यासाठी पालिकेकडून सध्या दुस्तीचे काम हाती घेतले आहे. याबाबतची माहिती पालिकेने शेअर करताच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पालिकेच्या या कामाचे कौतुक केले आहे. “हे पाहून आनंद झाला”, अशा शब्दात महिंद्रा यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले.
पालिका डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व पदपथांची दुरुस्ती करणार
“पुणे महानगरपालिकेने डिसेंबर २०२६ पर्यंत शहरातील सर्व खराब झालेले पदपथ दुरुस्त करण्याचा चंग बांधला आहे. नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सर्वांसाठी चालण्यायोग्य पदपथ मिळावेत हा मुख्य उद्देश आहे”, असे महानगरपालिकेने म्हटले आहे. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनातून जात आहे, असेही पालिकेने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आनंद महिंद्रांकडून कौतुक
पुणे महानगरपालिकेने शहरातील पदपथ दुरुस्तीचे हाती घेतलेले काम कौतुकास्पद असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. ‘पालिका शहरातील पदपथांची दुरुस्ती आणि अपग्रेड करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे हे पाहून आनंद झाला’, असे महिंद्रा म्हणाले आहेत.
नगर नियोजनाचे ‘पदपथ प्रथम’ धोरण
“चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले पदपथ शहरी जीवन कसे बदलू शकतात याबाबत मी गेल्या नोव्हेंबरमध्ये लिहिले होते. यासाठी खर्चही कमी लागतो आणि खर्चिक प्रकल्पांंच्या तुलनेत वेळही कमी लागतो. फूटपाथ म्हणजे रस्त्याला पर्यायी मार्ग नव्हे, ते शहराचा लोकशाही स्तर आहेत. पदपथांचा अर्थ सुरक्षित रस्ते, चालण्यायोग्य परिसर, निरोगी नागरिक आणि अधिक उत्साही स्थानिक व्यवसाय असा होतो. नगर नियोजनाचे ‘पदपथ प्रथम’ धोरण नागरिकांना प्राधान्य देते”, असे महिंद्रा यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

