पुणे : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यातील एका वकिलांनी क्रिकेटपटू हार्दिक पांड्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीची चौकशी अहमदाबाद पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. संबंधित तक्रार अर्ज अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळविल्यानंतर जल्लोष करण्यात आला. हार्दिक पांड्याने त्याच्या मैत्रिणीबरोबर मैदानावर जल्लोष केला. त्या वेळी हार्दिकने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार ॲड. वाजेद खान (बीडकर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. ॲड. खान यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात तपास करण्याचा अधिकार हा अहमदाबाद पोलिसांकडे आहे. त्यांच्या कार्यकक्षेत हा प्रकार घडल्याने शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित अर्ज अहमदाबाद पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. त्यानंतर तक्रार अर्ज तपासासाठी अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.