घाऊक औषध विक्रेत्यांच्या खरेदी बंदचा परिणाम आता किरकोळ विक्रेत्यांना जाणवू लागला असून काही विशिष्ट ब्रँडच्या औषधांसाठी त्यांना अनेक वितरकांकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. एकीकडे केमिस्ट असोसिएशन आणि प्रशासन यांच्यापैकी कुणीच मागे फिरायला तयार नाही तर दुसरीकडे हवा तो ब्रँड मिळाला नाही म्हणून ग्राहक परत जाईल याची भीती, अशा कोंडीत लहान किरकोळ विक्रेते सापडले आहेत.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित औषधांचा काही किरकोळ विक्रेत्यांकडे तुटवडा असल्यामुळे ग्राहकांना परत पाठवावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ग्राहकांना औषधाचा हवा तो ब्रँड मिळवण्यासाठी चार दुकाने फिरावे लागत असल्यामुळे गिऱ्हाईक जाण्याची भीतीही या विक्रेत्यांनी बोलून दाखवली. एका औषध उत्पादक कंपनीचे अनेक स्टॉकिस्ट असल्याने ग्राहकांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वितरकांकडे फिरावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
एका औषध विक्रेत्याने सांगितले, ‘‘सर्दी-तापासाठीची ‘क्रोसिन’, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीची ‘ग्लायसीफेज’ या गोळ्या, ‘सोफ्रामायसिन’सारखे मलम, त्वचारोगांशी संबंधित लोशन्स ही औषधे अधिक प्रमाणात लागत असल्याने त्यांचा पुरेसा साठा करून ठेवला होता. पण मधुमेह आणि रक्तदाबावरील औषधांसाठी ग्राहकांना परत पाठवावे लागत आहे. घाऊक विक्रेत्यांनी त्यांच्याकडे करून ठेवलेला औषधांचा अतिरिक्त साठा १५ जूनपर्यंत पुरला. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही फारसा तुटवडा जाणवत नव्हता. आता मात्र ५ जुलैपर्यंत किरकोळ दुकानांत नवीन माल आला नाही तर इतरही औषधांचा तुटवडा जाणवू शकेल.’’
आणखी एका विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, ‘‘वेगवेगळ्या ब्रँडच्या तीनशे औषधांची नोंदणी केल्यावर त्यांतील दोनशेच औषधे किरकोळ विक्रेत्यांना उपलब्ध होत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रुग्णालयांतील चोवीस तास सुरू असणारी औषध दुकाने आणि साखळी औषध दुकाने यांची बैठक घेऊन त्यांनी अतिरिक्त औषध साठा किरकोळ औषध विक्रेत्यांना पुरवावा, असा उपाय सुचवला होता. मात्र नवीन वितरकाकडून औषध खरेदी करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे त्यांनी या दुकानांकडून औषध खरेदी करण्यास सुरूवात केलेली नाही.’’