पुणे : काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ म्हणावे म्हणून भाजपकडून करण्यात येत असलेली निदर्शने हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केली. ‘भाजप आणि देशभक्तीचा काहीही संबंध नाही,’ असे विधानही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. राहुल गांधी यांच्या पुण्यातील यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘बाईक रॅली’चे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते. महिला काँग्रेसने काढलेल्या या फेरीला ऐतिहासिक भिडे वाड्यापासून सुरुवात करण्यात आली.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘भाजपने आणि त्यांच्या जनसंघ, हिंदूमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांनी कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणले नाही. तिरंगाही खांद्यावर घेतला नाही. शामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर, बॅरिस्टर जिन्नांबरोबर का होते? देशाला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून का विरोद करत होते? ‘वंदे मातरम्’ म्हणताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणते नेते फासावर गेले? या प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यावीत. भाजप आणि देशभक्तीचा काहीही संबंध नाही. काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ म्हणावे, म्हणून भाजपकडून करण्यात येत असलेली निदर्शने हास्यास्पद आहेत.’

‘राहुल गांधी यांचा कार्यक्रम ऐतिहासिक होणार’

‘महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला लढा आजही संपलेला नाही. पेपरफुटीविरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. शिक्षण, रोजगार, सुरक्षा, समानता आणि स्वतःचा आवाज मांडण्याचे स्वातंत्र्य हे विद्यार्थिनींचे मूलभूत प्रश्न आहेत. या प्रश्नांवर शनिवारी (२२ ऑगस्ट) राहुल गांधी सावित्रीच्या लेकींबरोबर संवाद साधणार आहेत. फुले दाम्पत्यांनी सुरू केलेला लढा आज राहुल गांधी पुढे नेत आहेत, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

त्यांना आपण साथ द्यायची आहे. पुण्यात होणारा राहुल गांधी यांचा कार्यक्रम ऐतिहासिक होणार असून, सावित्रीबाईंच्या विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थिनींच्या हक्कांचा आणि अपेक्षांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा आहे. विद्यार्थिनींच्या हक्कांचा हा आवाज पुण्यातून देशभर पोहोचवण्यासाठी ‘छात्रों की गूंज’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा,’ असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.