पुणे : ‘जे बोललो नाही ते, माझ्या तोंडी घालून जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न केला गेला,’ अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
निवडणूक प्रचारावेळी काँग्रेसकडूनच फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले. फडणवीसांपुढे काँग्रेसच पाय रोवून उभी होती. त्यामुळेच माझ्याविरोधात कुंभाड रचण्यात आले, असा आरोपही सपकाळ यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहर काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
सपकाळ म्हणाले, ‘फडणवीस हे ‘औरंगजेबाप्रमाणे क्रूर, नथूराम गोडसेंप्रमाणे थंड रक्ताने ‘गेम’ करणारे नेते आहेत. ते रेशीमबागेचा अजेंडा चालवित असून ‘बंच ऑफ थॉट्स’ प्रमाणे त्यांना देश चालवायचा आहे. निवडणूक आयोग, पोलीस, प्रशासन त्यांच्या खिशात आहे. त्यांच्या या कृतीला काँग्रेसने नेहमीच विरोध केला.
निवडणुकीत त्यांच्याविरोधात काँग्रेस उभी राहिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांचाही काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माझ्याविरोधात कुंभाड रचण्यात आले. जे बोललो नाही ते माझ्या तोंडी टाकून जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.’
‘टिपू सुलतानवर टीका करत त्यांना जातीभेद करायचा आहे. जातीय दंगली घडवण्याचाच त्यांचा उद्देश आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकसंधपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्याचा मला अभिमान आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.
