पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवन समोर आंदोलन केले. सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध केला. या वेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दगड भिरकावण्यात आल्याने काही कार्यकर्ते जखमी झाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करुन आक्षेपार्ह वक्तव्य केले. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शनिवारी सायंकाळी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी सपकाळ यांच्याविरुद्ध रात्री उशीरा पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले. शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनसमोर रविवारी सकाळी पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. सपकाळ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते तेथे जमले.
काँग्रेस भवन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घोषणाबाजी सुरू असताना भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी दगड भिरकाविण्यात आल्याने काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
