घर बांधतानाच सहाव्या मजल्यावर हिरवाई फुलवायची ठरले होते. तसे नियोजन केले होते. पंधरा वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल रिचार्जिग हे शब्द आज इतके प्रचलित नव्हते, त्या वेळी आमच्या नवीन इमारतीच्या आराखडय़ात माझे यजमान, सुनील भिडे यांनी इमारतीच्या गच्चीवरील पाणी बोअरमध्ये सोडून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आराखडा तयार केला होता. इमारतीसाठी बोअरवेल केली. तेव्हा आसपास फार बोअरवेल्स नव्हत्या. पाणी लगेच लागले. इमारत झाल्यावर गच्चीवरील पाणी पीव्हीसी पाइपमधून जमिनीतील सिमेंटच्या पन्हाळीतून बोअरकडे नेले, त्या पाण्याच्या वाटेत एक खड्डा केला, ज्यामध्ये पाण्यातून झालेली माती व इतर काही कचरा साठून केवळ पाणीच बोअरकडे जाईल, अशी व्यवस्था केली. बोअरच्या भोवती १० फूट बाय ८ फूट बाय १५ फूट असा विटांचा खड्डा बांधून घेतला व त्यामध्ये तळापासून विटांचे तुकडे व खडी भरली. सिमेंटच्या पन्हाळीतून आलेले गच्चीवरचे पावसाचे पाणी या खडीतून फिल्टर होऊन बोअरमध्ये जाते. बोअरमध्ये माती जाऊ नये म्हणून त्याभोवती भोकं पाडलेला जीआयचा सुरक्षित पाइप (केसिंग पाइप) बसवला आहे. या व्यवस्थेमुळे गच्चीवर पडणारे पाणी बोअरमध्ये जाते व बोअरच्या पाण्याने गच्चीवरील झाडांची पाण्याची गरज भागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे हे पटले की त्याचा गैरवापर होत नाही. गेली नऊ-दहा वर्षे माझ्या स्वयंपाक घरातील सिंकमध्ये नळाच्या खाली छोटी बादली ठेवलेली असते. भांडी धुतलेले पाणी, कपबशा विसळलेले पाणी, भाज्या, तांदूळ, डाळी, पोहे धुतलेले पाणी, हात धुतलेले पाणी यात साठवून झाडांना घातले जाते. दिवसाकाठी सात लिटरच्या तीन बादल्या असतात. रोज एकवीस लिटर पाणी झाडांना द्यायला उपयोगी पडते. साबणाच्या बारचे पाणी वापरल्याने झाडांना त्रास होत नाही, असा आमचा अनुभव आहे. अन्न कणांचे पाणी झाडांना आवडते. तुम्ही पण भांडी विसवलेले, फरशी पुसलेले पाणी झाडांना घालून पाणी वाचवू शकता. आमच्या गच्चीवर झाडे खूप. त्यामुळे पाण्याची गरज जास्त अन् गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस आम्हाला धक्क बसला. बोअरवेल आटली, कोरडी पडली, सुकून गेली. पंधरा वर्षांत आजूबाजूला झालेल्या विविध बदलाचा थेट परिणाम जाणवला. आजूबाजूला अनेक बोअरवेल झाल्या. कोणीही पाण्याचा पुनर्भरणाची तसदी घेतलेली नाही. खड्डय़ाच्या आजूबाजूला कुठेही मातीचा तुकडा शिल्लक राहिलेला नाही. सगळीकडे डांबर, काँक्रिट, पेव्हिंग ब्लॉक्स, नाही तर स्वच्छ शहाबाद फरशा बसल्या आहेत. आभाळाचं दान जमिनीला न मुरता वाहून जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harvesting rainwater for terrace garden use
First published on: 22-03-2017 at 02:45 IST