• उद्योगनगरीतही ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ची आवश्यकता
  • पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांचे मत

पुणे महापलिकेने शहरातील रस्त्यांवर अहोरात्र ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला, त्यावरून मोठे वादळ निर्माण झाले असतानाच, पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांनीही पिंपरी-चिंचवड शहरात ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ सुरू करावे, असे मत व्यक्त केले आहे. पालिकेचा पैसे कमवण्याचा हेतू नसेल, मात्र नागरिकांना वाहतुकीसंदर्भात शिस्त लावण्यासाठी ते गरजेचे आहे, अशी भूमिका महापौरांनी मांडली आहे. तथापि, सत्तारूढ भाजपने अद्याप यासंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली नाही.

पुणे शहरातील १८०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे व्यवस्थापन करणे अवघड आहे, असे सांगत शहरातील रस्त्यांवर अहोरात्र ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ योजना राबवण्यासाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली, त्यावरून पुण्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पाश्र्वभूमीवर, पिंपरीचे महापौर काळजे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना पुण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.  या निर्णयास होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता सत्तारूढ भाजपकडून महापौरांच्या या भूमिकेस समर्थन मिळते का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी काळजे यांची महापौरपदाची वर्षपूर्ती झाली, तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी हाच मुद्दा प्राकर्षांने मांडला होता. शहरात प्रशस्त रस्ते असूनही शहरात वाहतूक व्यवस्थेचा विचका झाला आहे. वाहतुकीचे नियोजन नाही, शिस्त पाळली जात नाही, अधिकारी कारवाई करत नाहीत. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. पुण्यात वाहतुकीचा खोळंबा होतो, मात्र पिंपरीत मोठे रस्ते असूनही तशीच परिस्थिती आहे. सायंकाळी तसेच घाईच्या वेळी विशेषत: लग्नसराईत  वाहतुकीची समस्या तीव्रपणे जाणवते. युरोपातही नसतील असे मोठे रस्ते आपल्याकडे असूनही वाहतुकीच्या अडचणी उद्भवतात. वाहतूक नियमांचे पालन न करण्याचे प्रकार सर्रास होतात. पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी बेशिस्त मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी महापौरांची भूमिका आहे.

नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे

पिंपरीत ही योजना राबवल्यास चांगलेच होईल. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी ते गरजेचे आहे. वाहतुकीच्या बेशिस्तीमुळे शहराच्या नावलौकिकास बाधा पोहोचत आहे. शहराचा विकास चांगल्या पद्धतीने झाला असताना वाहतुकीमुळे गालबोट लागते आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत या विषयावर चर्चा करण्याची आपली तयारी आहे. तसा प्रस्ताव मांडण्यात आल्यास त्यास मान्यता देण्याची आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.