सर्वोच्च न्यायालयाने टपरी, पथारी व हातगाडीधारकांना व्यवसाय करण्याचे अधिकार दिल्यामुळे कष्टकऱ्यांच्या संघर्षांचा विजय झाला आहे. मात्र, सरकारने हक्काची जागा व परवाना देईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे, अशी घोषणा कामगार नेते शरद राव यांनी केली.
नॅशनल हॉकर्स फेडरेशन आणि टपरी पथारी हातगाडी पंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राव बोलत होते. बाबा कांबळे, दादासाहेब सोनावणे, लक्ष्मण मिकम, किरण साळवी, शेख अलजीज, भीमराव मोरे, संतोष म्हस्के, तुळशीराम साळुंखे, रमेश शिंदे, रामभाऊ निगडे आदी या वेळी उपस्थित होते.
राव म्हणाले, की कायम उपेक्षित राहिलेल्या कष्टकऱ्यांचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने ऐकला. संघर्ष केल्याशिवाय आजच्या व्यवस्थेमध्ये काही मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची संपूर्ण अंमलबजाणी होईपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे.
बाबा कांबळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. असे असतानाही पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये पथारी व टपरीधारकांना महापालिकेकडून त्रास दिला जातो. त्यासाठी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखविली पाहिजे.