‘‘भारतातील प्रसिद्धिमाध्यमांना सरकार किंवा इतर बाह्य़ शक्तींकडून धोका नाही, तर स्वत:कडूनच जास्त धोका आहे. माध्यमांचे (आतबट्टय़ाचे) ‘रेव्हेन्यू मॉडेल’ ही त्यांच्यासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे,’’ असे मत ‘द हिंदू’ या दैनिकाचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात वरदराजन बोलत होते. यावेळी ‘झी २४ तास’ वाहिनीचे उस्मानाबाद येथील स्टिंजर महेश पोतदार यांना वरदराजन यांच्या हस्ते पहिला व्यंकटेश चपळगावकर स्मृती पुरस्कार देण्यात आला.
‘‘भारतीय माध्यमे १५-२० वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक चांगले काम करत आहेत. ती अन्यायाविरुद्ध फारशी सहिष्णूता दाखवत नाहीत. बातम्यांच्या विषयातील वैविध्य, माहिती पुरविण्याच्या प्रमाणात वाढ, त्यातील अचूकता या गोष्टी वाढलेल्या आहेत. मात्र, त्याच वेळी त्यांची विश्वासार्हता कमालीची घसरली आहे, ती रसातळाला गेली आहे. सध्या माध्यमांना सरकार किंवा बाह्य़ शक्तिंकडून धोका नाही, तर धोका आतूनच आहे. त्याला माध्यमांचे ‘रेव्हेन्यू मॉडेल’ कारणीभूत आहे. वृत्तपत्रांचा उत्पादन खर्च अधिक, तर विक्रीमूल्य कमी असते. त्यामुळे त्यांना खर्च भागविण्यासाठी ९० ते ९५ टक्के जाहिरातींवरच अवलंबून रहावे लागते. परिणामी वृत्तपत्रांना जाहिरातदारांच्या दबावाला वृत्तपत्रांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर ‘पेड न्यूज’मुळेही वृत्तपत्रांची विश्वासार्हता धोक्यात येत आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘वाढत्या स्पर्धेमध्ये घाईघाईने बातम्या देण्याच्या वृत्तीमुळेही त्याची विश्वासार्हता संपत चालली आहे. बातमी देताना ती वेगवेगळ्या मार्गाने खात्री करून मगच देणे आवश्यक आहे. चुकीची बातमी पहिल्यांदा देण्यापेक्षा ती बातमी प्रसिद्ध केली नाही तरी चालेल. आपल्या वैयक्तिक मतांचा प्रभाव बातमीमध्ये दिसणार नाही, याचीही काळजी बातमीदाराने घ्यायला हवी,’’ अशी अपेक्षाही वरदराजन यांनी व्यक्त केली.