पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाचे (एचसीएमटीआर) काम आता सुरू होणार आहे. ‘नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पासाठी दोन निविदा काढल्या जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,’ अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सिंहगड रस्ता आणि विमाननगर भागात ‘एचसीएमटीआर’चे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी प्रत्येकी दोन हजार कोटी असा सर्वसाधारण खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिका कर्ज घेणार असून, यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. त्याची जाहिरातदेखील महापालिकेने गेल्या आठवड्यात काढली आहे. रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंंडी सोडविण्यासाठी ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) डिसेंबरपर्यंत तयार होणार आहे.

पुणे शहराचा चारही दिशांना होत असलेला विस्तार, वाढत असलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत अरुंद आणि अपुरे असलेले रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होते. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एचसीएमटीआर’ तसेच शहराच्या आजूबाजूंनी रिंग रोड उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष आग्रही असून विविध पातळ्यांवर याच्या बैठका सुरू आहेत.

‘‘एचसीएमटीआर’साठी ४ लाख ९८ हजार ३९० चौरस मीटर जमीन संपादित करावी लागणार असून, त्यासाठी अंदाजे २ हजार ६३४ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा आणि धानोरी या १५ भागांतील जागांचा त्यामध्ये समावेश आहे.

तसेच, काही सरकारी जागांवरूनदेखील हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गसाठी ज्या सरकारी विभागांच्या जागांची आवश्यकता भासणार आहे. त्याचा एकत्रित प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवावा, या सर्व जागा विनामोबदला देण्यात येतील,’ असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेला दिले आहे.

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांवर ‘एचसीएमटीआर’चे काम सुरू केले जाणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड), वडगाव बुद्रुक, सातारा रस्ता, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, लुल्लानगर असा दहा किलोमीटर अंतराचा तर विमाननगर चौक, विश्रांतवाडी, बाँबे सॅपर्स, खडकी असा १२ किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी काही खासगी जागा मालकांच्या जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठीचे महापालिकेचे नियोजन सुरू असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.