घरच्या हालाखीची परिस्थितीमुळे आणि कमी वयात घराची जबाबदारी अंगावर आल्याने अनेकांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. पण शिक्षण घेण्याची जिद्द, आवड असल्यावर कोणत्याही वयात शिक्षण घेता येऊ शकते, हे पुण्यातील अनिल बोराटे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. फुलांचा व्यवसाय करताना वयाच्या ५१ व्या वर्षी ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

अनिल बोराटे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “घरची परिस्थिती बेताची असल्याने, माझं शिक्षण ५ वी पर्यंत झालं होतं. आमचा फुलं विक्रीचा व्यवसाय होता. तोच व्यवसाय पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं आणि आजअखेर व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायानिमित्ताने पैशांच्या व्यवहारांसाठी नेहमी बँकेत जाव लागत होतं. माझ शिक्षण कमी असल्यानं बँकेची स्लिप मला भरता येत नव्हती. त्यामुळे प्रत्येकवेळी बॅंकेत गेल्यावर ती आजूबाजूच्या व्यक्ती किंवा कर्मचारी वर्गाकडून भरून घ्यावी लागत होती. याचा प्रत्येकवेळी मलाही त्रास होत होता.”

“त्यानंतर एकदा मनात आलं की, आपल्याला लहान असताना शिक्षण घेता आलं नाही. मात्र आता शिक्षण घेऊ शकतो. माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण सुरू असून त्यांनी देखील मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी इयत्ता ८वीमध्ये नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शाळेत प्रवेश घेऊन तीन वर्ष झाले असून व्यवसाय आणि शाळा करणे खूप कठीण गेले. मात्र शिकण्याची जिद्द असल्याने आज लहान वयात राहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान, अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. आता पुढे आर्ट्स शाखेतून पदवी घेण्याची इच्छा आहे.”

“माझं शिक्षणाचं राहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. त्यामुळे आयुष्यात जिद्दीच्या जोरावर सहज यश मिळू शकते. मात्र, परीक्षेत अपयश आले म्हणून चुकीचे पाऊल उचलू नका, पुढील तयारीसाठी सज्ज रहा. निश्चित तुम्हाला यश मिळेल” असा सल्ला देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.