पुणे : कुटुंबातील एकमेव कमावत्या तरुणाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. खासगी रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अखेर त्याने ससूनमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वीपणे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आणि सरकारी योजनांसह सामाजिक संस्थांच्या मदतीमुळे अगदी कमी खर्चात हे उपचार शक्य झाले.

कर्वेनगरमधील हा तरुण ३७ वर्षांचा आहे. तो एका छपाई व्यावसायिकाकडे कामाला होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याची दोन्ही मूत्रपिंडे खराब झाल्याचे डॉक्टरांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये सांगितले. त्यानंतर त्याने लगेच डायलिसिस सुरू केले. डॉक्टरांनी त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्याने एका खासगी रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी विचारणा केली असता त्यांना १५ लाख रुपये खर्च सांगण्यात आला.

आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा विचार सोडून दिला. त्यानंतर तो डायलिसिसवर होता. त्याला मित्रांनी ससून सर्वोपचार रुग्णालयात कमी खर्चात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने ससूनमधील समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे यांची भेट घेतली. त्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, होणारा खर्च आणि मदत करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच, सरकारी योजनांची माहिती दिली. ससूनमध्ये अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया शक्य असल्याचेही सुरवसे यांनी सांगितले.

तरुणाची आई मूत्रपिंडदान करण्यास तयार झाली. त्यानंतर १५ मे रोजी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव आणि शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. निरंजन आंबेकर व डॉ. संदीप मोरखंडीकर, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ हर्षद तोष्णीवाल व डॉ विवेक बारेकर, डॉ. शार्दूल दाते, डॉ ऋषिकेश पारशी व डॉ. विशाल सावकार यांचा या शस्त्रक्रियेत सहभाग होता. ससूनमधील शस्त्रक्रियेसाठी एकूण १० लाख रुपयांचा खर्च आला. त्यातील ९ लाख रुपयांची मदत आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून मिळालेली आहे.

गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण

ससूनमध्ये मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत कमी खर्चात केल्या जातात. ही रुग्णालयातील ३३ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. गरीब व गरजू रुग्णांना ससूनमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावयाची असेल तर त्यांनी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख किंवा समाजसेवा अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दर गुरुवारी दुपारी २ ते ४ या वेळेत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) क्रमांक ६० येथे डॉक्टरांना भेटावे, असे आवाहन ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.