पुणे : चाकणमधील वाहतूककोंडीमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा रोजचा सुमारे एक तास वाढला आहे. त्यामुळे कंपनीला बसच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. प्रवासात एक तास अधिक वाढल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि व्य़ावसायिक जीवनाच्या संतुलनावर होत आहे, अशी माहिती मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी गुरुवारी दिली.
मर्सिडीज-बेंझचा उत्पादन प्रकल्प चाकण औद्योगिक वसाहतीत आहे. चाकणमधील वाहतूककोंडीमुळे अनेक उद्योगांना मोठा फटका बसत आहे. याबाबत विचारणा केली असताना संतोष अय्यर म्हणाले, की चाकणमध्ये वाहतूककोंडीची समस्या आहे. वाहतूककोंडीची समस्या ही सकाळच्या वेळी फारशी नाही; मात्र, संध्याकाळी अधिक तीव्र स्वरूपात जाणवते. आमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा रोजचा वेळ एक तासाने वाढला आहे. कर्मचाऱ्यांसाठीच्या बसच्या वेळापत्रकातही त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचा एक तास प्रवासात रोज वाया जात असल्याने त्यांचा कुटुंबाला देण्याचा वेळ एक तासाने कमी होतो. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या संतुलनावर याचा परिणाम होत आहे.
आणखी वाचा- पुण्यातील खड्डे जीवघेणे! दुचाकी घसरून अपघात वाढले; दुखापतीच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांची वाढ
चाकण औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) कोंडी सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. सरकारकडून यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. चाकणमधील परिस्थिती १५ ते २० दिवसांत सुधारेल, अशी हमी सरकारने दिली आहे. त्यामुळे भविष्यात वाहतूककोंडी कमी होईल, अशी आशा आहे, असे अय्यर यांनी स्पष्ट केले.
मर्सिडीजच्या दोन नवीन मोटारी सादर
मर्सिडीज-बेंझच्या वतीने जीएलसी ४३ ४मॅटिक कूपे आणि सीएलई ३०० कॅब्रिओलेट एमजी लाइन या दोन मोटारी सादर करण्यात आल्या. या वेळी संतोष अय्यर म्हणाले की, पुण्यात आमची विक्रीतील वाढ ११ टक्के आहे. त्यातही एकचतुर्थांश मोटारी या टॉप एण्ड मॉडेल आहेत. देशातील एकूण विक्रीत पुण्याचा वाटा तीन टक्के आहे. त्याचबरोबर मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक मोटारींनाही मागणी वाढत आहे.
आणखी वाचा-पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा; खर्च किती कोटींवर?
चाकणमधील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या ठिकाणी तातडीने रस्त्यांचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमनासाठी पोलिसांनी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर द्यायला हवा. -दिलीप बटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
चाकण चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. कंपन्या सुटण्याच्या वेळेत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. मर्सिडीज कंपनीसमोरील रस्त्यासह इतर रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले आहेत. दीर्घकालीन खड्डे दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात येणार असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. -एस. एन. चौडेकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ