प्रश्नपत्रिका फूट प्रकरण

पुणे : आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचे धागेदोरे मुंबईतील आरोग्य संचालनालयात पोहोचले असून मुंबईतील सहसंचालक महेश बोटले यांना बुधवारी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली.

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात पुणे  पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने  लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय ५०) यांच्यासह पाच जणांना मंगळवारी अटक केली. तेव्हा मुंबईतील आरोग्य संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्नपत्रिका दिल्याचे बडगिरे याने पोलिसांना सांगितले. चौकशीत आरोग्य संचालनालयातील सहसंचालक (तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान) महेश सत्यवान बोटले (वय ५३ ,रा. मुलुंड ,मुंबई) प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात सामील असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून बोटले यांना बुधवारी अटक करण्यात आली.

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील पथकाकडून बोटले यांच्या मुंबईतील  कार्यालय आणि निवासस्थानाची झडती घेण्यात आली. त्यांना मुंबईतून सकाळी ताब्यात घेण्यात आले. बडगिरे याने सुरूवातीला प्रश्नपत्रिका फूट  प्रकरणात १५ लाख रुपये मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याला ३३ लाख रुपये मिळाल्याची माहिती मिळाली आहे. बडगिरेने शिकवणीचालक तसेच काही जणांना प्रश्न पत्रिका पुरवून जवळपास ८० लाख रुपये मिळवले असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत मिळाली आहे.

आर्थिक फायद्यासाठी…

आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत महेश बोटले सदस्य होते. प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्यानंतर ती संगणकावर ठेवण्यात आली होती. त्या संगणकाची इत्थंभूत माहिती (अॅक्सेस) बोटले यांच्याकडे होती. त्यांनी प्रश्नपत्रिका लातूरमधील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला २३ किंवा २४ ऑक्टोबरला पाठविल्याचे पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात उघड झाले, तसेच प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात ते सामील असल्याचे निश्चित झाले आहे. आर्थिक फायद्यासाठी बोटले, बडगिरे यांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.