पुणे : ‘गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्येही गढूळपणा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि गार करूनच प्यावे आणि शक्य असल्यास कोमट पाण्याचा वापर करावा,’ असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महापालिकेनेही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन केले आहे.


दर वर्षी पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विषमज्वर, कावीळ, कॉलरा, अतिसार, उलट्या, मळमळ आणि विविध पोटांचे विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पावसामुळे पाण्याच्या स्रोतांमध्ये गाळ, सांडपाणी किंवा इतर अशुद्ध घटक मिसळण्याची शक्यता वाढते. अनेकदा पाण्यावर प्रक्रिया केली जात असली, तरी काही घातक जीवाणू पूर्ण नष्ट होत नाहीत. त्यामुळे पाणी किमान काही मिनिटे उकळून त्यानंतरच पिणे अधिक सुरक्षित ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे घशाचे संसर्ग, सर्दी आणि पचनाशी संबंधित त्रासही कमी होण्यास मदत होते.

महापालिकेची तयारी

पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचाही धोका वाढत असल्याने पुणे महापालिकेने पूर्वतयारी सुरू केली आहे. संवेदनशील भागांची ओळख करून तेथे औषधफवारणी, आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तापरुग्णांचा शोध, साथरोगांचे सर्वेक्षण, विविध विभागांमध्ये समन्वय, कीटकनाशकांचा पुरेसा साठा, वृद्धाश्रम व निवासी संस्थांमध्ये विशेष तपासणी तसेच डासांच्या उत्पत्तीस्थळांवर नियंत्रणासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापन राबविण्यात येणार आहे.

पावसाळ्यात काळजी आवश्यक

  • पाणी उकळून आणि गार करून प्या.
  • पिण्याच्या पाण्याच्या नळाला स्वच्छ फडके बांधा.
  • उघड्यावर ठेवलेले पाणी किंवा दूषित पाणी पिणे टाळा.
  • उलट्या, जुलाब, ताप किंवा कावीळची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पावसाळ्यात जुलाब, उलट्या, मळमळ असे त्रास होऊ शकतात. नागरिकांनी पाणी गाळुन घ्यावे. बाहेरचे पाणी आणि उघड्यावरचे अन्न पूर्ण टाळावे. – डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन

पाणी अयोग्य पद्धतीने साठवून ठेवल्याने डासांची पैदास होते. बाहेर उघड्यावर नारळाच्या करवंट्या असल्याने यामध्ये पाणी साठू शकते. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. ज्यामुळे डासांची पैदास होणार नाही. पाण्यावर तेलाचा तवंग असल्यास डास होत नाहीत.
डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य आधिकारी, महापालिका

पाणी उकळून प्या

गढूळ पाणी स्वच्छ सुती कापडाने गाळून घ्या आणि त्यानंतर किमान १० ते १५ मिनिटे चांगले उकळून, थंड करूनच पिण्यासाठी वापरा. पाण्यात जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टरांच्या किंवा पालिकेच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात ‘क्लोरिन’चे थेंब किंवा ‘मेडिक्लोअर’चा वापर करा. पाणी साठवण्याची भांडी, पिंप किंवा टाक्या नियमित स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी नेहमी झाकून ठेवा. – डॉ. अनिल जोशी, जनरल फिजिशियन