पुणे : Health experts advise on Drumming Injuries गणेशोत्सवाच्या दीड महिने आधी ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होतो. अगदी लहान मुलांपासून तरुण हिरिरीने या सरावात सहभागी होतात. त्यांचा उत्साह आणि जोश वाखाणण्यासारखा असतो. मात्र, या ढोल-ताशावादनामुळे या वादकांमध्ये आरोग्याच्या अनेक गंभीर तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. पाठदुखीसह लघवीतून रक्त येणे अशा स्वरूपाच्या तक्रारीही पाहायला मिळत आहे.
हेही वाचा >>> स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा… राज्य शासनाकडून ते’ परिपत्रक रद्द
गणेशोत्सवात मागील काही काळापासून ढोल-ताशा पथकांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे या पथकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणेशोत्सवाच्या दीड महिने आधीपासून जुलैमध्येच या पथकांचा सराव सुरू होतो. हा सराव दररोज सुमारे दीड ते दोन तास सुरू असतो. या पथकातील मुले आणि मुली २० ते ३० वर्षे वयोगटातील असतात. यातील अनेक जणांना शारीरिक श्रमाची सवय नसते. त्यामुळे खूप वेळ ढोल वाजविल्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे.
हेही वाचा >>> ‘आरटीई’ प्रवेशांसाठी मुदतवाढ… अजूनही किती जागा रिक्त?
ढोल-ताशा पथकातील वादक ढोल हा पोटाच्या खालच्या भागात बांधतात. त्यामुळे सातत्याने ढोलाचे घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होण्याचे प्रकार घडतात. याचबरोबर अनेक जणांना पाठदुखीची समस्या जाणवते. लहान वयात ठरावीक स्नायूंवर अतिताण देणे धोकादायक ठरते. हे वादक वादनासाठी ठरावीक स्नायूंचा अतिवापर करतात. त्यामुळे या स्नायूंना दुखापत, सूज येणे अशा तक्रारी निर्माण होतात. गणेशोत्सवानंतर पथकातील अनेक मुले-मुली डॉक्टरांकडे अशा तक्रारी घेऊन येतात, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली.
ढोल-ताशा वादकांना होणारे त्रास
– पाठदुखी
– मनगट, कोपर दुखणे
– बहिरेपणा
– हाता-पायाला सूज येणे
– लघवीतून रक्त येणे
ढोल-ताशा पथकातील मुले ढोल हा पोटाच्या खालच्या बाजूला बांधतात. सातत्याने त्या ठिकाणी घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होते. त्यामुळे लघवीतून रक्त येण्याच्या तक्रारी सुरू होतात. गेल्या काही दिवसांत माझ्याकडे असे दोन ते तीन रुग्ण आले आहेत. याचबरोबर पोटदुखीच्या तक्रारीही या मुलांमध्ये आढळून येतात. – डॉ. शिरीष भावे, मूत्रविकारतज्ज्ञ
ढोल-ताशा पथकात दीर्घकाळ वादन केल्यामुळे मुलींना पाठदुखी आणि हात दुखणे अशा समस्या जाणवू शकतात. सतत वादन केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. कारण सातत्याने शरीरावर ताण आल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. ढोल-ताशा पथकातील मुलींच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. – डॉ. आरती निमकर, स्त्रीरोगतज्ज्ञ
ढोल कंबरेवर बांधण्याची आणि तो वाजविताना शरीराची हालचाल करण्याचीही विशिष्ट पद्धत असते. वादकाकडून त्यात चूक झाल्यास पाठदुखी आणि हात दुखणे अशा तक्रारी सुरू होतात. चुकीच्या पद्धतीने वाजविल्यामुळे मणक्यावर ताण येऊ शकतो. शारीरिक श्रमाची सवय नसलेल्या मुलांच्या शरीरावर वादनामुळे ताण येऊन आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. – डॉ. मिलिंद मोडक, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ
ढोलाचे वजन सुमारे बारा ते चौदा किलो, तर ताशाचे वजन सुमारे सात ते आठ किलो असते. दीड महिना तासभराचा सराव, विसर्जन मिरवणुकीचा एक दिवस वादन करून काही आजार झाल्याचे निदर्शनाला आलेले नाही. याबाबत बऱ्याच पथकांतील तरुणांशी बोललो आहे. मी स्वतः ४७ वर्षे ताशावादन करत आहे. आतापर्यंत मला स्वतःलाही त्रास झालेला नाही. – पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा पथक महासंघ
© The Indian Express (P) Ltd